हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्दगारलेले हे वाक्य इतिहासात अमर आहे. राजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्नं पाहिलं आणि अखेर 6 जून1674 रोजी शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला. राज्य, सैन्य बळ, रणनीती, शस्त्रशास्त्र विद्या पारंगत असूनही राजांना राज्याभिषेक करवून घेण्यासाठी वयाचं 44 वर्ष यावं लागलं. रयतेवर अपार माया, स्त्रियांविषयी आदरभाव आणि धर्माचं संरक्षण या तत्वावर आधारित स्वराज्याचा डोलारा असूनही राजांना राज्याभिषेक करवून घ्यायला देखील अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं.
महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत कॉ. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकात इतिहासातील काही उल्लेखनीय घटना नमूद केल्या आहेत. गोविंद पानसरे यांच्या अभ्यासानुसार, शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांची युद्धनीती यायाबत परकीय सत्तांना विशेष कुतूहल होतं. शिवाजी महाराजांना वारसा हक्काने सिंहासन आणि राज्य मिळालं नव्हतं ते त्यांनी स्वतः च्या बळावर निर्माण केलं होतं. त्यामुळे जरी शिवाजी आपला शत्रू असला तरी त्याचं कार्य कौतुकास्पद आहे आधीच भावना परकीय सत्तांमध्ये होती.शत्रुच्याही मनात आपल्या विषयी आदर निर्माण करणारे असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवाजी महाराजांचे कार्य आणि राज्य हे इतर राजांच्या तुलनेत फार वेगळं होतं. शिवाजीराजांचं कार्य आणि त्यांचं स्वराज्य हे रयतेस आपलं वाटत असे आणि महाराज खऱ्या अर्थाने तिथेच जिंकले होते. एवढं सगळं असूनही या रयतेच्या राजाला स्वतः चा राज्याभिषेक करवून घेण्यासाठी इतका वेळ का लागला?गोविंद पानसरे यांनी पुस्तकात नमूद केल्यानुसार, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काही ब्राम्हणांनी विरोध केला होता. मिर्झाराजे जयसिंग याला विजय प्राप्त व्हावा या उद्देशाने मराठी ब्राम्हणांनी कोटी चंडी यज्ञ केला होता. असं असलं तरी महाराष्ट्रातील सर्व ब्राम्हण वर्ग शिवाजी राजांच्या विरोधात होता का ? तर असंही नाही. हा प्रश्न फक्त फक्त ब्राम्हण किंवा पुरोहितांचा नव्हता,मूळ प्रश्न हा चातुर्वर्ण्य धर्मचाच होता, असं गोविंद पानसरे यांनी नमूद केलं आहे.
शूद्र हे प्रजातपतीच्या पायापासून जन्माला आले, वरील तिन्ही वर्णाची सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही, अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शुद्रात देवाला अंश असणं शक्य नाही, असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शुद्र नाही, अशी त्याकाळी हिंदू धर्मात काही अनिष्ठ रुढी होत्या. या संघर्षाला शिवाजी महाराज देखील चुकले नाहीत. मात्र असं असतानाही राजांशी एकनिष्ठ असलेले काही ब्राम्हण सेनापती देखील होते ज्यांनी स्वराज्याच्या प्राण पणाला लावत परकीय आक्रमणांशी लढले होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान असण्याबरोबर धाडसीन सेनानी देखील होते. त्या काळच्या धर्माबाबतच्या मर्यादा या शिवरायांना देखील होत्या. त्यामुळे या मर्यादा राजांनी देखील मान्य केल्या होत्य़ा. या सगळ्या आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्ट यांनी शिवरायांची वयाच्या 44 व्या वर्षी मुंज केली आणि मंत्रविधींसह पुन्हा विवाह लावला. सुवर्ण मोहरांची उधळण केली आणि त्यानंतर राजांचा राज्याभिषेक झाला.
अनेकांना परिचयाचं नसेल पण शिवरायांच्या पहिला राज्याभिषेक हा 6 जून रोजी झाला तर दुसरा राज्याभिषेक तीन महिन्यांनी झाला. निश्चलपुरी गोसावी नावाचे यजुर्वेदी तांत्रिक गोसावी राजांना त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकानंतर भेटले. पहिल्या राज्याभिषेकातील काही त्रुटींमुळे राजांची पत्नी काशीबाई गेल्या, जिजाऊंचं निधन झालं अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. त्यानंतर मंत्रिमंडळातील काही सल्लागारांचं म्हणणं मान्य करुन राजांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक करण्यात आला.
सदर लेख हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर आधारित आहे.