World Emoji Day 2025 This emoji is banned in some countries and can lead to jail
World Emoji Day 2025 : आजच्या डिजिटल युगात जर कोणी भाषा नव्याने जन्माला घातली असेल, तर ती म्हणजे ‘इमोजी’ची भाषा. शब्द न वापरता भावना, विचार, राग, प्रेम, मजा, दु:ख अगदी काहीही व्यक्त करण्याचा हा नवा मार्ग आजच्या पिढीला विशेष भावतो. त्यामुळेच दरवर्षी १७ जुलै रोजी ‘वर्ल्ड इमोजी डे’ साजरा केला जातो. पण हे इमोजी सर्वांनाच आवडतात असे नाही! जगात असेही काही देश आहेत जिथे इमोजी पाठवणं म्हणजे कायद्याचा भंग मानला जातो. काही ठिकाणी तर ‘हार्ट इमोजी’ पाठवल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते!
१९९९ साली जपानमध्ये ‘शिगेताका कुरिता’ या युवकाने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी इमोजी तयार केले. त्यावेळी मोबाईलवरील मेसेजिंग मर्यादित शब्दांत होती आणि भावना व्यक्त करणं कठीण जात होतं. हे लक्षात घेत त्यांनी १७६ इमोजींचा पहिला संच तयार केला, ज्याचा उपयोग लोकांनी भरभरून केला. आज हे इमोजी न्यू यॉर्कमधील Museum of Modern Art मध्ये संग्रहित आहेत.
इंटरनेट क्रांतीनंतर इमोजीचा वापर झपाट्याने वाढला. २०१३ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘इमोजी’ हा शब्द आपल्या शब्दकोशात समाविष्ट केला. २०१५ मध्ये तो ‘वर्षाचा शब्द’ म्हणून घोषित झाला. यानंतर युनिकोड कन्सोर्टियम ही ना-नफा संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था कोणते नवीन इमोजी यावेत, त्यांचे डिझाईन कसे असावे, याचा निर्णय घेते. गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
आज सोशल मीडियावर दररोज सुमारे १० अब्ज इमोजी पाठवले जातात. त्यातील 😂 (Face with tears of joy) हा इमोजी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहे. इमोजी प्लॅटफॉर्मवर थोडाफार वेगळा दिसतो, पण भावना व्यक्त करण्यात तो नेहमीच प्रभावी ठरतो.
जागतिकीकरणामुळे जिथे इमोजी एक ‘युनिव्हर्सल भाषा’ बनत आहेत, तिथे काही देशांनी मात्र त्यांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत:
सौदी अरेबिया : LGBTQ+ संबंधित 🌈, 👬, 👭 इमोजींवर बंदी आहे. इतकंच नव्हे, एखाद्याला ❤️ हार्ट इमोजी पाठवल्यास ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. याला “अनैतिक संबंधांना प्रोत्साहन” मानले जाते.
इराण : येथे प्रेम, चुंबन, नृत्य, पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित इमोजी तसेच LGBTQ+ इमोजींवर बंदी आहे. देशातील इस्लामी मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
रशिया : येथे LGBTQ+ संदर्भातील कोणतीही इमोजी, स्टिकर्स, किंवा पोस्ट्स यांच्यावर बंदी आहे. सोशल मीडियावर देखील याचे काटेकोर निरीक्षण केले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्रह्मांड अफाट आहे! पृथ्वीभोवती फिरत आहेत ‘लपलेले चंद्र’? संशोधनातून उघड झाले मिनीमूनचे अद्भुत रहस्य
जिथे एक इमोजी आपल्यातल्या भावना एका क्षणात दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, तिथे त्यावर शिक्षा, बंदी ही गोष्ट काहींना विचित्र वाटू शकते. परंतु प्रत्येक देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आणि राजकीय मर्यादा वेगळ्या असतात. त्यामुळेच आजच्या ‘वर्ल्ड इमोजी डे’च्या निमित्ताने आपण या नव्या भाषेचे मोल जाणून घेतले पाहिजे, आणि वापरताना आपला सोशल मीडिया वापर जबाबदारीने केला पाहिजे.