आशियाई खेळ २०२३ : आशियाई खेळ २०२३ मधील तिरंदाजी स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस होता. वैयक्तिक पदकांचे सामने ७ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. ऑलिंपियन अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तुषार शेळके यांचा भारतीय पुरुष रिकर्व्ह संघ अंतिम फेरीत कोरिया रिपब्लिक विरुद्ध सामना झाला. यामध्ये भारताच्या तिगडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ली वुसोक, ओह जिनह्येक आणि किम जे देओक यांचा समावेश असलेल्या कोरियन संघाकडून भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदकाचा सामना ५-१ असा गमावला.
या वर्षाच्या सुरुवातीला बर्लिन येथे झालेल्या तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेत्या कोरियन संघाचे तीनही कोरियन खेळाडू होते. ओह जिनह्येक आणि किम जे देओक हे देखील टोकियो २०२० च्या चॅम्पियन पुरुषांच्या रिकर्व्ह संघाचा भाग होते. अंतिम फेरीत प्रवेश करताना, भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाचा ५-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत बांगलादेशचा ४-२ असा पराभव केला. सोमवारी, भारतीय त्रिकुटाने १६ च्या फेरीत हाँगकाँगचा ६-० असा धुव्वा उडवला.