

ग्रेड 9 आऊट-एज सांघिक प्रकारात महाराष्ट्राला सुवर्ण
प्रसाद सालापची ऑल-अराउंड प्रकारातही बाजी
जीत चव्हाणची ग्रेड 9 इन-एजमध्ये अव्वल कामगिरी
Gymnastics National Championship : पहिल्या युथ आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिसरा दिवस महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी गाजवला. मालाड येथील आयएनएस हमला येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने 'ग्रेड 9 आऊट-एज' तर उत्तर प्रदेशने 'ग्रेड 9 इन-एज' गटातील सांघिक विजेतेपदे पटकावली.
महाराष्ट्र संघाने अचूकता, ताकद आणि सातत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत 177.400 गुणांसह 'ग्रेड 9 आऊट-एज' सांघिक गटात अव्वल स्थान मिळवले. उत्तर प्रदेशने कडवी झुंज देत 173.199 गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर पश्चिम बंगाल 154.035 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
'आऊट-एज' गटात महाराष्ट्राच्या प्रसाद सालापने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर 63.633गुण मिळवून वैयक्तिक 'ऑल-अराउंड' विजेतेपद पटकावले. त्याचाच सहकारी आदेश वाघचौडे 61.501 गुणांसह दुसऱ्या, तर सर्व्हिसेसचा आयुष नाथ 60.900 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
प्रसादने विविध उपकरणांवरील अंतिम फेरीतही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने अत्यंत संयम, ताकद आणि नियंत्रणाचे प्रदर्शन करत चार सुवर्णपदके आपल्या नावावर केली. त्याने 'पॉमेल हॉर्स', 'स्टिल रिंग्ज', 'पॅरलल बार्स' आणि 'हॉरिजॉन्टल बार' या प्रकारांत सुवर्णपदक मिळवून आपली अष्टपैलू क्षमता दाखवून दिली. हरियाणाच्या रितिकने 'फ्लोर एक्सरसाइज' प्रकारात बाजी मारली, तर सर्व्हिसेसच्या तुषार खानराने 'व्हॉल्ट' प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
'ग्रेड 9 इन-एज' गटात उत्तर प्रदेशने शानदार सांघिक कामगिरी करत 194.533 गुणांसह बाजी मारली. सर्व्हिसेस 185.466 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले, तर ओडिसा (जीएफआय-2) संघ 185.366 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्राच्या जीत संतोष चव्हाणने अत्यंत प्रभावी अष्टपैलू (ऑल-राउंड) कामगिरी केली. त्याने हालचालींमधील सुलभता, अचूक लँडिंग आणि तांत्रिक अचूकता यांचा सुरेख मेळ घालत 67.034 गुणांसह वैयक्तिक अव्वल स्थान मिळवले. उत्तर प्रदेशच्या यथार्थ केसरवानीने 65.634 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर त्याचाच सहकारी कुश 65.533 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती.
जीतने 'अपॅरेटस फायनल्स'मध्येही आपले वर्चस्व राखले. त्याने उत्कृष्ट लय आणि नियंत्रणाचे प्रदर्शन करत 'फ्लोअर एक्सरसाइज' आणि 'पॉमल हॉर्स' प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. यथार्थने आपली ताकद आणि कौशल्य दाखवत 'स्टिल रिंग्ज' आणि 'हॉरिझॉन्टल बार' प्रकारांत अव्वल स्थान पटकावले, तर उत्तर प्रदेशच्या उज्ज्वल कुमार पंडितने 'पॅरलल बार्स' प्रकारात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. कर्नाटकच्या साई दक्ष मोहन कदमने 'व्हॉल्ट' प्रकारात अव्वल स्थान मिळवून 'अपॅरेटस' विजेत्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले.