
अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) विजयी सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (India vs west indies) सहा गडी राखून विजय मिळवला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य भारताने २८ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून रोहितने ६० धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाचा हा १००० वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. टीम इंडियाने आता ५१९ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. या मालिकेसह रोहित शर्मा पहिल्यांदाच नियमित कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेतली आहे.