भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप, सौजन्य : आयएएनएस
भारताच्या योगासन सादरीकरणाने चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींना प्रभावित केले. अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात आयोजित पहिल्या ‘ BRICS पारंपरिक आणि स्वदेशी क्रीडा प्रात्यक्षिक महोत्सव 2026’मध्ये भारताच्या योगासनासह मल्लखांब आणि कलरीपयट्टूने उपस्थितांची मने जिंकली. या एकदिवसीय कार्यक्रमात 10 देशांतील सुमारे 160 खेळाडू आणि सहभागी प्रतिनिधींनी भाग घेतला.
सोमवारी झालेल्या या महोत्सवात सहभागी देशांच्या पारंपरिक आणि स्वदेशी क्रीडाप्रकारांचे प्रदर्शन करण्यात आले. चीनचे वुशू, भारताचा मल्लखांब, कझाकस्तानचा तोगिझकुमालक आणि ब्राझीलचा ब्राझिलियन जिऊ-जित्सू यांसह विविध खेळांचे सादरीकरण करण्यात आले.
भारताच्या सादरीकरणात योगासनाचाही समावेश होता. योगासनाविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेली उत्सुकता या कार्यक्रमातून अधोरेखित झाली. चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी भारतीय योगासनाचे विशेष कौतुक केले.
दक्षिण आफ्रिकेचे शेफ-डी-मिशन फिलासांडे मॅकविली यांनी साई मीडियाशी बोलताना योगाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, योग हा दक्षिण आफ्रिकेतही लोकप्रिय असलेल्या उपक्रमांपैकी एक आहे. तणाव कमी करण्यासाठी, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी अनेक जण योगाचा सराव करतात. आम्हाला योग खूप आवडतो.
Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!
वीर सावरकर क्रीडा संकुलातील सुमारे 3 हजार प्रेक्षकांनी भारतीय युवा पथकाच्या मल्लखांब प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर लयबद्ध आणि आकर्षक पद्धतीने योगासनाचे सादरीकरण करण्यात आले.
तसेच चीनचे शेफ-डी-मिशन यी लियू यांनीही भारतीय योगासनाचे कौतुक केले. ते म्हणाले, आज आम्ही योगाबद्दल बरेच काही पाहिले आणि शिकलो. सरावादरम्यान लहान मुलांना अद्भुत हालचाली करताना पाहिले. आम्हाला योगाबद्दल आणखी जाणून घ्यायचे आहे.
या महोत्सवामुळे विविध देशांतील खेळाडूंना आपापल्या क्रीडाप्रकारांचे ज्ञान आणि अनुभव एकमेकांशी सामायिक करण्याची संधी मिळाली. एका चिनी वुशू खेळाडूने नारायणपुरा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील खेळाडूंना वुशूच्या बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले.
क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच भारताने केलेल्या पाहुणचाराचे आणि आयोजनाचेही सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी कौतुक केले. यी लियू यांनी सांगितले की, भारतात आगमन झाल्यापासून चिनी प्रतिनिधींचे उत्तम स्वागत करण्यात आले. मध्यरात्री विमानतळावर पोहोचल्यानंतरही नृत्य पथकाने त्यांचे स्वागत केले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी मिळाली. डोसा हा त्यांच्यासाठी विशेष अनुभव ठरला.
रशियन प्रतिनिधिमंडळाच्या प्रमुख ज्लाटा याकोवलेवा यांनीही भारताच्या पाहुणचाराची प्रशंसा केली. BRICS देशांमधील मैत्री आणि एकत्रितपणे अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी ही या महोत्सवातील सर्वांत आवडलेली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या महोत्सवात भारताचे सर्वाधिक 50 सहभागी होते. चीनने 30, इराणने 22, तर दक्षिण आफ्रिकेने 14 जणांचे पथक पाठवले होते.
महोत्सवात बेलारूसने गोरोडकी, बोलिव्हियाने लुचा दे चोलितास आणि टिंकू, ब्राझीलने जिऊ-जित्सू आणि कॅपोइरा, चीनने लायन डान्स, वुशू आणि हेल्थ किगाँग, तर इराणने झुरखानेह, हफ्त सांग आणि घनिये यांचे प्रदर्शन केले.
कझाकस्तानने असिक अटू, तोगिझकुमालक आणि कझाक कुरेसी; रशियाने साम्बो आणि गोरोडकी; दक्षिण आफ्रिकेने कगाती आणि इंटोंगा; तर संयुक्त अरब अमिरातीने अल्ताब्बाह या पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले. भारताने मल्लखांब, योगासन आणि कलरीपयट्टू या क्रीडाप्रकारांतून आपली सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरा जगासमोर मांडली.






