आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
बुद्धिबळासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियात अन्वीने आपल्या खेळाची छाप पाडली. ती चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत असून, तिला ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ब्लिट्झ प्रकारातील नऊ फेऱ्यांमध्ये अन्वीने आठ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. आठ विजय आणि एका पराभवासह तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.
तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला साडेसात गुणांसह रौप्य, तर रशियाच्या लेयला इसायेवा हिला सहा गुणांसह कांस्यपदक मिळाले. पाचव्या फेरीतील पराभवानंतर अन्वीने सलग चार विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांना चपळाईने प्रत्युत्तर देत तिने दबावाखालीही एकाग्रता कायम राखली. या कामगिरीमुळे तिच्या फिडे ब्लिट्झ मानांकनात ५८ गुणांची वाढ झाली.
कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
स्टँडर्ड प्रकारात अन्वीने नऊ फेऱ्यांत साडेसहा गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवा हिने आठ गुणांसह सुवर्ण, तर रशियाच्या मिया कुद्र्याशोवा हिने सहा गुणांसह कांस्यपदक जिंकले. वेगवान ब्लिट्झ आणि दीर्घ विचाराला वाव देणाऱ्या स्टँडर्ड या दोन्ही प्रकारांत पदक मिळवून अन्वीने आपल्या खेळातील अष्टपैलुत्व सिद्ध केले. अन्वीला यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे. वयाच्या आठ वर्षे अकरा महिन्यांत तिने वुमन कॅन्डिडेट मास्टर हा फिडेचा किताब मिळवला. २०२५ मध्ये ग्रीसमधील जागतिक कॅडेट व युवा जलदगती आणि ब्लिट्झ स्पर्धेत तिने उपविजेतेपद पटकावले होते. ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथील पश्चिम आशिया युवा स्पर्धेतही तिने वैयक्तिक व सांघिक प्रकारांत सहा पदके जिंकली आहेत.
अन्वीच्या कामगिरीचे कौतुक करताना आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित यांनी तिची वेगवान निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पराभवानंतर पुनरागमन करण्याची वृत्ती उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ती भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्येही यश मिळवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…
अन्वीचे वडील दीपक हिंगे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुलीच्या मेहनतीला कुटुंबाचा पाठिंबा असून, तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लक्ष्य स्पोर्ट्स यांचे सहकार्य मोलाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासाठी दोन पदके जिंकल्याचा आनंद व्यक्त करत अन्वीने भविष्यात मानांकन वाढवून जागतिक स्तरावरील मोठी विजेतेपदे मिळवण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. तुला येथील दुहेरी यशामुळे या युवा बुद्धिबळपटूने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.






