चहलच्या फिरकीची जादू IPL लिलावातही; ठरला सर्वात महागडा फिरकीपटू
IPL 2025 मेगा लिलावात पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार चढाओढ पहायला मिळाली. गुजरातने ३४ वर्षीय चहलसाठी पहिली बोली लावली आणि त्यानंतर चेन्नईनेही यात उडी घेतली. बोली १४ कोटींच्या पुढे गेली. चहलवरील बोली सातत्याने वाढत होती. यादरम्यान पंजाब किंग्जला चहलच्या फिरकीने भूरळ घातली होती. त्यामुळे पजाबने अखेरच्या क्षणी १८ कोटींची बोली लावली आणि चहलला आपल्या संघात समाविष्ट केलं.
युझवेंद्र चहल १८ कोटीं इतक्या मोठ्या किंमतीला खरेदी करण्यात आलेला पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहल राजस्थानने रिलीज केल्यामुळे लिलावाचा भाग होता. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा चहल एकमेव गोलंदाज आहे. त्याने १६० आयपीएल सामन्यात २०८ विकेट घेतल्या आहेत. या लीगमध्ये २०० हून अधिक विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. चहलला आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.