फोटो सौजन्य- X
पॅरिस ऑलिम्पिकचा आजचा पाचवा दिवस अवघे विश्व गेल्या शुक्रवारपासून ऑलिम्पिकमय झाले आहे. ऑलिंम्पिकमध्ये जगातील मातब्बर खेळाडू दर्जेदार खेळ करत आहेत. भारताच्या मनु भाकरनेही 2 पदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अजून एक महिला खेळाडूची सर्वत्र चर्चा आहे. त्या महिला खेळाडूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिला कोणतेही पदक जिंकता आले नसले तरी तिने अप्रतिम धैर्य दाखवले असून तिच्या या धैर्याला जग सलाम करत आहे. इजिप्तची तलवारबाज नादा हाफेझ सात महिन्यांची गरोदर असतानाही ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती.
इजिप्तची राजधानी कैरो येथील रहिवासी असलेल्या नादा हाफीजचे हे तिसरे ऑलिम्पिक होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ती म्हणाली. विशेष म्हणजे नादाने राऊंड ऑफ 32 मध्ये अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 असा पराभव केला होता. यानंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिला दक्षिण कोरियाच्या जिओन ह्योंगकडून 15-7 असा पराभव पत्करावा लागला होता.
Competing at seven months PREGNANT! 🤯
Egyptian fencer Nada Hafez made it to the last 16 in women’s individual sabre and then shared her special news on Instagram 🤰#Paris2023 #Olympics pic.twitter.com/5dVIJS5XgT
— Eurosport (@eurosport) July 30, 2024
नादा म्हणाली, “माझ्या न जन्मलेल्या मुलाने आणि मला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले, मग ते शारीरिक असो वा भावनिक. गर्भधारणेचा काळ स्वतःच कठीण असतो. जीवन आणि खेळ यांच्यात समतोल राखण्यासाठी संघर्ष करणे खूप कठीण आहे.”
नादा आपल्या पतीच्या समर्थनाबद्दल म्हणाली की, “मी भाग्यशाली आहे की मला माझ्या पतीचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे मी इथंपर्यंत पोहचले.”
7 महिन्याची गरोदर असताना नादाने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला तोही तलवारबाजी खेळात यासाठी तिच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये असे अनेक खेळाडू जगाला त्यांच्या कामगिरीतूनच नव्हे तर त्यांच्या धैर्यातून त्यांच्या वर्तनातूनही प्रेरणा देतात.