Maharashtra wins six medals in Khelo India Youth Sports Championship during the day
Khelo India Youth Championship : खेलो इंडिया स्पर्धेत पुण्याच्या स्वराज भोंडवेने नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारांत महाराष्ट्रासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चेन्नई येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या शुटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत केवळ २ शॉट गमविल्याने रौप्य पदक हुकले. त्रिपुराच्या तनिष्क नायडूने सुवर्ण तर आंध्र प्रदेशच्या मुकेश नेलावल्ली याने रौप्य पदक जिंकले.
खेलो इंडिया स्पर्धेत स्वराजची कांस्यपदकाची कमाई
यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत स्वराजने कांस्यपदकाची कमाई केली होती. मात्र यावेळी सुवर्णपदकाचे स्वराजचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पुण्यातील बालेवाडीमधील गगन नारंग अॅकादमीमध्ये सराव करणारा स्वराज म्हणाला, गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आहे. मात्र, मी आता केवळ १६ वर्षांच्या असल्याने सुवर्ण पदक मिळविण्यासाठी मला अजून दोन संधी आहेत. पुढील वर्षी अजून जास्त सराव करून नक्कीच सुवर्णपदक जिंकणार आहे.
खोखो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा दोन्ही गटात लागोपाठ दुसरा विजय
मदुराई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील खो-खोच्या मुलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा २५-२० एक डाव व पाच गुणांनी पराभव केला व साखळी गटात लागोपाठ दुसरा विजय नोंदवित उपांत्य फेरीसाठी वाटचाल कायम राखली. त्यावेळी महाराष्ट्राकडून भारतसिंग (एक मिनिट ५० सेकंद), रमेश वसावे (एक मिनिट ४० सेकंद), विराज गळतगे व विकास देशमाने (प्रत्येकी दोन मिनिटे) यांनी संरक्षणात उत्तम कामगिरी केली. त्यांना वैभव मोरे ( ४ गडी व दीड मिनिटे) व सार्थक बालबुद्धे (३ गडी) यांची सुरेख साथ लाभली.
तामिळनाडूचा केला पराभव
मुलींच्या गटातही महाराष्ट्राने लागोपाठ दुसरा विजय नोंदविताना तामिळनाडूचा ३२-२१ असा एक डाव ११ गुणांनी दणदणीत पराभव केला. त्याचे श्रेय सानिका चाफे (एक मिनिट ४० सेकंद), निशा वैजलं (एक मिनिट ५० सेकंद) दीपाली राठोड (दोन मिनिटे), कल्याणी कंक (३ गडी व दीड मिनिटे) यांना द्यावे लागेल. त्यांना संपदा मोरे व सुहानी धोत्रे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करीत चांगली साथ दिली.
साखळी गटातील पहिल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघांनी मुले व मुली या दोन्ही गटात विजय मिळवत शानदार प्रारंभ केला होता. गतविजेत्या महाराष्ट्राने मुलींच्या गटात कर्नाटक संघाचा ३०-१३ असा दणदणीत पराभव केला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघाचा ३९-३५ असा पराभव केला होता.