

तीन दशकांहून अधिक काळ गाजवले रेसलिंगचे विश्व
मेक्सिको सिटीमध्ये रंगणार निरोपाचा सामना
2023 मध्ये हॉल ऑफ फेममध्ये समावेश
WWE मधील लोकप्रिय आणि दिग्गज रेसलर रे मिस्टेरियोने व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. 20270 मध्ये तो रिंगला कायमचा निरोप देणार असून, 12 जून रोजी मेक्सिको सिटी येथे त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना रंगणार आहे. या घोषणेमुळे तीन दशकांहून अधिक काळ रेसलिंग विश्व गाजवणाऱ्या एका पर्वाचा शेवट होणार आहे.
51 वर्षीय रे मिस्टेरियोने रविवारी झालेल्या WWEच्या 'सर्व्हायव्हर सीरिज : वॉरगेम्स' या कार्यक्रमानंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मेक्सिको सिटीतील 'एस्टाडियो बॅनॉर्टे' (पूर्वीचे एस्टाडियो अझ्टेका) येथे हा निरोपाचा सामना होणार आहे. WWEनेही या सामन्याला प्रीमियम लाइव्ह इव्हेंटचा भाग म्हणून दुजोरा दिला आहे.
'सर्व्हायव्हर सीरिज'मध्येही मिस्टेरियोने सहभाग घेतला होता. टीम मेक्सिकोकडून खेळताना त्याने पेंटा, रे फिनिक्स, ड्रॅगन ली आणि एल ग्रांडे अमेरिकानो यांच्यासह टीम अमेरिकेचा पराभव केला. विरोधी संघात सीएम पंक, कोडी रोड्स, सेथ रॉलिन्स, जेव्हॉन इव्हान्स आणि एलए नाइट यांचा समावेश होता.
मिस्टेरियोने १९८९ मध्ये किशोरवयातच व्यावसायिक रेसलिंगला सुरुवात केली. 2002 मध्ये WWEमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने WCW,ECW, AAA आणि CMLL यांसारख्या स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली. मेक्सिकोच्या 'लुचा लिब्रे' या वेगवान आणि हवेत झेप घेणाऱ्या रेसलिंग शैलीला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
रंगीत मास्क, अफलातून चपळाई आणि '619' या खास मूव्हमुळे ते जगभरातील चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. WWE कारकिर्दीत त्याने तीन जागतिक अजिंक्यपदे, रॉयल रंबल, तीन युनायटेड स्टेट्स विजेतेपदे, दोन इंटरकॉन्टिनेंटल विजेतेपदे आणि पाच टॅग टीम विजेतेपदे पटकावले. तीन वेळा क्रूझरवेट चॅम्पियन ठरलेल्या मिस्टेरियोचा 2023 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.