राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्स प्रमाणे भारताचे कुस्तीपटू देखील खेळात दमदार कामगिरी दाखवून पदकांचा पाऊस पाडत आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी दहियाने राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात नायजेरियाच्या कुस्तीपटूला मात देऊन सुवर्ण पदक जिंकले आहे. रवी ने जिंकलेल्या पदकानंतर भारताच्या खात्यातील सुवर्ण पदकांची संख्या दहावर येऊन पोहोचली आहे. तर कुस्तीतील भारताचे हे आतापर्यंतचे चौथे पदक आहे.
कुस्तीपटू रवी दहिया याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेकदा दमदार डाव खेळत महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदकाला गवसणी घालणाऱ्या रवीला भारताचा दिग्गज कुस्तीपटू म्हणून ओळखले जाते. त्याचप्रकारे त्याने दमदार कामगिरी करत आता सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
भारताचा कुस्तीपटू रवी कुमार नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा १०-० असा पराभव केला. रवी कुमार दहियाची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा होती त्याने पहिल्याच स्पर्धेत फायनल पर्यंत धडक मारली होती. रवी दहियाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत नायजेरियाच्या कुस्तीपटूवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याला संधी मिळताच रवी दहियाने गटरेज डाव खेळत पहिल्या फेरीत ८ गुण मिळवले. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात उरलेले दोन गुण मिळवत तांत्रिक सरसतेवर सामना १०-० असा जिंकला. रवी ने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.