भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गेल्या महिनाभरापासुन दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन तुर्तास थांबलं आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि कुस्तीपटूंमधील (Wrestler Protest) चर्चेत कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. मात्र, या प्रकरणी आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “सूडाच्या भावनेनं त्यांनी WFI प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, पण त्यांना आता स्वतःची चूक सुधारायची आहे.” आता सत्य बाहेर यावं अशी त्यांची इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
या प्रकरणी बोलतान त्यांनी सांगितलं की, सरकारनं गेल्या वर्षी झालेल्या चाचणीत त्यांच्या मुलीच्या पराभवाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे, म्हणूनच त्यांनी सत्य बोलण्याचा निर्णय घेतला आहे. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीच्या नसून त्यांचा होता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “हा माझा निर्णय होता. मी बाप आहे आणि तिच्यावर रागावलो होतो. मी घडत असलेल्या घडामोडी तिला सांगितल्या, पण त्यानंतर माझ्या मुलीनं “बाबा, तुम्हीच पाहा.”, असं मला सांगितलं.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनीही त्यांच्या आणि त्यांच्या मुलीनं बृजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. याची सुरुवात 2022 मध्ये लखनौ येथे झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीनं झाली, ज्यामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी भारतीय संघात प्रवेश करू शकली नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी रेफ्रींच्या निर्णयासाठी त्यांनी बृजभूषण यांना जबाबदार धरलं होतं. ते म्हणाले की, “मी सूडाच्या भावनेनं भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एक वर्षाची मेहनत पंचाच्या चुकीच्या निर्णयानं व्यर्थ गेली. त्यामुळेच मी बदला घेण्याचं ठरवलं”
दुसरीकडे, अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांच्या वक्तव्यावर बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, “त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाहीत. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली, त्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली. माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिद्ध झालं आहे.”
दरम्यान, बुधवारीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत बैठक घेतली होती. यानंतर पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केलं होतं.