महाराष्ट्रात किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष उभा ठाकलेला असताना दिल्लीतून एक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील कुतुबमिनार (Qutubminar) हा आजपर्यंत पर्यटकांसाठी आकर्षण राहिला होता. हाच कुतुबमिनार आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कुतुबमिनारामध्ये गणपतीच्या मूर्ती (Lord Ganesh Idol) असून त्या तेथून हलविल्या जाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी या मूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसं पत्रही त्यांनी पुरातत्व विभागाला पाठवलं आहे. तरुण विजय यांच्याकडून ही मागणी केली जात असताना भाजपच्या नगरसेविका आरती सिंग यांनी या गणेशमूर्ती कुतुबमिनारमध्येच ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. या मूर्तींची कुतुबमिनारामध्येच योग्य ठिकाणी स्थापित करण्यात याव्यात आणि त्यांची पूजा-अर्चा करण्यात यावी अशी मागणी सिंह यांनी केली आहे.
मोहम्मद गोरीसोबत हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुबमिनार बांधला होता. कुतुबमिनार बांधत असताना त्याने मंदिरे जमीनदोस्त करून त्या जागेवर ही वास्तू उभी केली असं सांगितलं जातं. भाजप नगरसेविका आरती सिंह यांनी म्हटलंय की कुतुबमिनारच्या जागी आधी मंदिरच होतं. आजही कुतुबमिनाराच्या आतल्या भागात देवी-देवतांच्या मूर्त्यांचे अवशेष पाहायला मिळतात असंही त्यांचं म्हणणं आहे.
तसेच मशिदीच्या परिसरात या देवी-देवतांच्या मूर्ती जमिनीवर ठेवून त्यांचा अपमान केला जात आहे असं सिंह यांनी म्हटलंय. या मूर्ती कुतुबमिनारातच योग्य ठिकाणी स्थापित करून त्यांची पूजा-अर्चा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे