Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त
भारतातील प्रसिध्द उद्योजक रतन नवल टाटा यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांनी उद्योग, टेक, इंन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, इंटरनेट, टेलिकॉम इंडस्ट्री अशा सर्वाच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आतापर्यंत आपण असं अनेकवेळा ऐकलं असेल की जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल झाले. पण तसं नाही. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील मोठे बदल रतन टाटा यांनी केलं आहे. कॉलिंग आणि इंटरनेट स्वस्त करून सर्व मोबाईल युजर्सना फायदा व्हावा, हे रतन टाटा यांचे प्रमुख उदिष्ट होते. जिओ जे बदल आता करत आहेत, ते टाटा यांनी 2008 मध्येच केले होते.
हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा अर्थ काय?
रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार करताना अनेक क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरु केले. यातीलच टाटा यांची एक दूरसंचार कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस. टाटा टेलिसर्व्हिसेसने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले. ज्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited (TTL) आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo ही कंपनी भारतात सुरू केली. देशभरातील सर्व मोबाईल युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट उपलब्ध व्हावे, हा या कंपनीचा प्रमुख उद्देश होता. जेव्हा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. अशा परिस्थितीत टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.
टाटा डोकोमोने 1 पैसा प्रति सेकंद दर ही स्कीम लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला आहे. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट दर आकारत होत्या. म्हणजे जर तुम्ही 10 सेकंद किंवा 59 सेकंद बोलले तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत काही वेळा मोबाईल युजर्सचे नुकसान व्हायचे. पण Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह पैसे आकारण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट झाला.
दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. रतन टाटा यांनीच कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. इतकेच नाही तर त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, जे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.
रतन टाटांच्या या प्लॅनिंगमुळे डोकोमो कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने केवळ 5 महिन्यांत 10 दशलक्षाहून अधिक ग्राहक जोडले. या पायरीनंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.
टाटा डोकोमोने भारतात प्रवेश केल्यानंतर, एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या 29 टक्क्यांनी वाढून 43 टक्क्यांवर गेली आहे. 2009 मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या 50 कोटी होती, जी 2014 पर्यंत 80 कोटींवर गेली.
टाटा डोकोमोच्या स्वस्त प्लॅन्समुळे टेलिकॉम ऑपरेटर्सच्या कमाईत मोठी घट झाली आहे. वाढते युजर्स आधार असूनही, दूरसंचार कंपन्यांचा महसूल अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. याचे थेट कारण म्हणजे या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे नियमित अपग्रेडेशन. 2010 मध्ये 3G स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तेव्हा दूरसंचार कंपन्यांसाठी नेटवर्कचा विस्तार आणि अपग्रेडेशन महाग झाले. याचा परिणाम टाटा डोकोमोवरही झाला आणि जपानी कंपनी डोकोमोने भारत सोडला तेव्हा टाटा समूहाची दूरसंचार कंपनी इतर स्पर्धकांपेक्षा मागे पडली.