

आकाशातील फटाक्यांची आतषबाजी
निष्काळजीपणा की अपघात?
२०२६ च्या स्पर्धेत एकूण ५६१ फुग्यांनी भाग घेतला
Myanmar Viral Video : म्यानमार येथील प्रसिद्ध 'ताझौंगडाईंग' हॉट-एअर बलून महोत्सवात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. जेव्हा या उत्सवाचे रूपांतर अचानक भीती आणि किंकाळ्यांमध्ये झाले. शान राज्याची राजधानी असलेल्या ताउंगगी येथील या वार्षिक महोत्सवादरम्यान, फटाक्यांनी भरलेला एक महाकाय बलून गर्दीच्या अगदी वर हवेतच निकामी झाला. फटाके वेळेपूर्वीच फुटले, ज्यामुळे जळत्या ठिणग्या आणि तुकडे थेट खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.
ही भीषण दुर्घटना २० नोव्हेंबरच्या रात्री, रात्रीच्या बलून उड्डाण स्पर्धेदरम्यान घडली. नेहमीप्रमाणे, आकाशातील फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. पण जसा तो महाकाय बलून वर गेला, तेवढ्यात त्याला आग लागली. आकाशात उंच झेपावण्याऐवजी, फटाके जमिनीच्या अगदी जवळ फुटले.
फटाक्यांच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे उपस्थित लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना आणि किंचाळताना स्पष्टपणे दिसत आहेत. पडणाऱ्या ठिणग्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी अंगावर ब्लँकेटही घेतले होते. या घटनेत सोळा जण भाजले, तर घबराट आणि किरकोळ जखमांमुळे सुमारे १२० जणांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. सुदैवाने, या घटनेत कोणीही ठार झाले नाही.
खरं तर, म्यानमारमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिव्यांचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवसा बांबू आणि कागदापासून बनवलेले हस्तनिर्मित फुगे उडवले जातात. दिवसा प्राण्यांच्या आकाराचे फुगे उडवले जातात, तर 'न्यामेकी' (फटाक्यांनी सजवलेले फुगे) आणि 'सिनापान' (कंदीलांनी सजवलेले फुगे) यांमुळे आकाशाची शोभा आणखी वाढते. २०२६ च्या स्पर्धेत एकूण ५६१ फुग्यांनी भाग घेतला होता, त्यापैकी ११२ फुगे रात्री उडणारे होते. एवढ्या मोठ्या गर्दीत आणि मोठ्या संख्येने असलेल्या फुग्यांमध्ये सुरक्षितता हे नेहमीच एक मोठे आव्हान असते.