कोरोनाच्या संकटातून जग सावरलं नसताना आता मंकीपॅाक्स (Monkey Pox) या नव्या रोगानं आता डोकं वर काढलं आहे. अफ्रिकेतून आलेल्या या रोगानं आता जगाची चिंता वाढवली आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, नायजेरिया, कॅमेरून आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये याचा उद्रेक दिसून आला आहे.
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.