Joe Biden
बीजिंग : युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांतील युद्ध अद्यापही सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हे युद्ध सुरु आहे. असे असताना त्यातच चीनने रशियाला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांच्या रूपात तांत्रिक मदत केली आहे. यावरूनच अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली असून, युक्रेनवरील हल्ल्यासाठी चीनने रशियाला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांच्या रूपात तांत्रिक मदत करणे ही ‘मोठी चूक’ असल्याचे म्हटले आहे.
चीनची राजधानी बीजिंगमधील अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांनी हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘रशियन हल्ला आता त्याच्या तिसऱ्या वर्षात युरोपमध्ये ‘अस्तित्वाचे संकट’ बनले आहे. या भयंकर युद्धासाठी रशियन फेडरेशनचा संरक्षण औद्योगिक पाया आणखी मजबूत करण्यासाठी हजारो चीनी कंपन्या रशियाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत आहेत.
तसेच चीन निःपक्षपाती नाही. मात्र, या युद्धात त्याने प्रभावीपणे रशियाची बाजू घेतली आहे. हा निर्णय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर जोर देण्याच्या चीनच्या दीर्घकालीन तत्त्वाच्या विरोधात आहे. चीनने रशियाला थेट लष्करी मदत न देण्याचा आग्रह धरला असला तरी इतर माध्यमातून मदत केली जात आहे.
याशिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यातही बैठका होत असल्याचे म्हटले आहे. बर्न्सच्या या टिप्पण्यांवर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.