Could these superpowers trigger disaster NATO warns
NATO warning superpowers : नाटोचे नवे महासचिव मार्क रुटे यांनी जगाला एका गंभीर संभाव्य संकटाचा इशारा दिला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील संगनमत तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकते. त्यांच्या मते, चीनकडून तैवानवर हल्ला आणि रशियाकडून नाटो देशांवर आक्रमण हे एकाच वेळी घडल्यास जग गंभीर आण्विक संघर्षाच्या उंबरठ्यावर जाईल.
न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मार्क रुटे यांनी म्हटले की, “तैवानवर हल्ला करण्याआधी जिनपिंग पुतिनला फोन करतील. ते सांगतील की मी आता तैवानकडे वाटचाल करतोय, आणि याच वेळी तुला नाटोच्या भूभागावर लक्ष ठेवायचे आहे जेणेकरून पश्चिमेकडील लक्ष पॅसिफिककडून हटेल.” रुटे यांचा दावा आहे की अशा घडामोडींमुळे अमेरिका आणि नाटो युरोपमध्ये अडकतील आणि चीनला तैवानवर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यांनी चीनच्या हल्ल्याची शक्यता २०२७ पर्यंत असल्याचेही संकेत दिले, जे अमेरिकन आणि तैवान अधिकाऱ्यांच्या अंदाजाशी सुसंगत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खलिस्तानी षड्यंत्राचा सूत्रधार हॅपी पसिया अखेर अडकला जाळ्यात; लवकरच भारताकडे होणार प्रत्यार्पित, NIAने घट्ट केली पकड
रुटे यांचा अंदाज भयावह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे संभाव्य दुहेरी आक्रमण अण्वस्त्रांच्या वापरासही कारणीभूत ठरू शकते, जे संपूर्ण मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकते. त्यामुळे त्यांनी नाटो देशांना त्यांच्या सैनिकी क्षमतेत तातडीने वाढ करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “आपल्याला माहित आहे की चीन तैवानकडे लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत जुनी दोन टक्के जीडीपी संरक्षण खर्चाची संकल्पना अपुरी आहे. आपल्याला नाटोची सामूहिक ताकद वाढवावी लागेल, जेणेकरून रशिया युरोपवर हल्ला करण्याच्या विचारापासून दूर राहील.”
रुटे यांच्या या विधानावर रशियाची जोरदार प्रतिक्रिया आली आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतिनचे निकटवर्तीय दिमित्री मेदवेदेव यांनी रुटे यांच्या या भाकिताची उपहासात्मक शब्दांत खिल्ली उडवली आहे. मेदवेदेव म्हणाले, “रुटे यांनी बहुधा डच मशरूम जास्त प्रमाणात खाल्ले आहेत. त्यांना चीन-रशिया संगनमताचे भ्रम आहेत.” ते पुढे म्हणाले, “माझ्या मते, रुटे यांनी रशियन भाषा शिकायला हवी. ती सायबेरियन छावणीत उपयुक्त ठरेल.” रशियाच्या या उत्तरामुळे दोन्ही बाजूंतील तणाव अधिक गडद झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तैवानवर चीनकडून आणि युरोपवर रशियाकडून एकाचवेळी हल्ला होण्याची शक्यता आता आंतरराष्ट्रीय चर्चेचा गंभीर विषय बनली आहे. अमेरिका, नाटो आणि इतर सहयोगी देश यासाठी सज्ज होत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन-पाक युतीत ताण? पाकिस्तानचा चिनी सामरिक तंत्रज्ञानावर अविश्वास; J-35 Fighter plane खरेदीच्या चर्चांना स्पष्ट नकार
मार्क रुटे यांचा इशारा केवळ एक राजकीय विधान नसून, आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेला गंभीर इशारा मानला जात आहे. जर चीनने तैवानवर आणि रशियाने युरोपवर एकाच वेळी हल्ला केला, तर जग एका अण्वस्त्र महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहू शकते. नाटोच्या पुढील रणनीती, अमेरिका-चीन संबंध आणि युक्रेन युद्धातील घडामोडींचा परिणाम जागतिक राजकारणावर दूरगामी असणार आहे, हे निश्चित.