Pakistan rejects J‑35A deal : चीनच्या पाचव्या पिढीतील अत्याधुनिक J-35A स्टेल्थ लढाऊ विमान खरेदीबाबत पाकिस्तान सरकारने अधिकृत नकार दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तान या विमानांची खरेदी करत नाही. त्यांनी या चर्चांना फेटाळत, हे सर्व वृत्त माध्यमांनी उचललेली “फक्त चर्चा” असल्याचे म्हटले आहे.
जून 2025 मध्ये ब्लूमबर्ग व इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दावा केला होता की पाकिस्तान हे चीनच्या J-35A लढाऊ विमानाचे पहिले परदेशी ग्राहक ठरणार आहे. चीनच्या AVIC शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन कडून तयार करण्यात आलेले हे स्टेल्थ जेट अत्याधुनिक तंत्रज्ञान, रडार चुकवण्याची क्षमता आणि PL-17 लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. या बातम्यांनंतर AVIC चे शेअर्स बाजारात तब्बल 10 टक्क्यांनी वधारले होते.
ख्वाजा आसिफ काय म्हणाले?
अरब न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “आम्ही जे-३५ खरेदी करत नाही आहोत. ही सगळी मीडिया चर्चा आहे. मला वाटते, ही फक्त चिनी संरक्षण विक्रीसाठी प्रसिद्धीची एक शक्कल आहे.” त्यांनी या चर्चांचा स्पष्टपणे इन्कार केला आणि पाकिस्तानच्या संरक्षण धोरणावर कोणताही प्रभाव नसल्याचे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण
माध्यमांचा दावा काय होता?
ब्लूमबर्ग आणि इतर माध्यमांनी दावा केला होता की पाकिस्तान चीनकडून 30 ते 40 J-35A विमानांची खरेदी करणार आहे, आणि त्याचे डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पर्यंत होऊ शकते. याशिवाय, पाकिस्तानी वैमानिकांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, चीन या करारावर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यासही तयार आहे, असेही वृत्त होते.
पाकिस्तानने खरेदीपासून मागे का घेतले?
1. भारतासोबतच्या तणावाची पार्श्वभूमी:
मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमावाद आणि हवाई संघर्ष घडून आला होता. अशा परिस्थितीत चीनकडून स्टेल्थ विमाने खरेदी करण्याची पुष्टी करणे म्हणजे भारतासाठी थेट चिथावणी ठरली असती. त्यामुळे पाकिस्तानने हे टाळण्याचे धोरण स्वीकारले आहे.
2. आर्थिक मर्यादा आणि IMF चे बंधन:
पाकिस्तान IMF च्या कर्ज व्यवस्थापनाखाली आहे. अशा वेळी अब्जावधी डॉलर्सचा लष्करी खर्च करणे, त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सार्वजनिकरित्या नकार देऊन पाकिस्तान आपली जबाबदार वित्तीय प्रतिमा टिकवू इच्छितो.
3. चीनची संभाव्य व्यूहरचना:
अनेक संरक्षण विश्लेषकांचा असा विश्वास आहे की ही संपूर्ण चर्चा चीनने जाणीवपूर्वक पसरवलेली ‘मार्केटिंग रणनीती’ होती. पाकिस्तानला संभाव्य ग्राहक म्हणून दाखवून, चीनने J-35 विमानासाठी इजिप्त, अल्जेरिया सारख्या इतर देशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
चीनने अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही
या साऱ्या घडामोडींवर चीनकडून अजून कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा नकार देण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरण अजूनही धूसर आहे. तथापि, पाकिस्तानच्या स्पष्ट नकारामुळे चीनच्या संरक्षण क्षेत्रातील रणनीतीला काही प्रमाणात धक्का बसल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘400 किमीची रेंज, लक्ष्य होईल नष्ट…’ भारताचा इस्रायलसोबत ‘LORA’ क्षेपणास्त्राचा करार; पाकिस्तान चिंतेत
डिप्लोमॅटिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठा झटका
चीनच्या संरक्षण उद्योगासाठी पाकिस्तान हा एक महत्त्वाचा भागीदार मानला जातो. मात्र, J-35A विमान खरेदीबाबत पाकिस्तानने दिलेला नकार चीनसाठी डिप्लोमॅटिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठा झटका ठरू शकतो. यामुळे भारत-पाक संबंधांवर परिणाम होणार नाही, तसेच पाकिस्तानची आर्थिक व राजनैतिक प्रतिमा जगासमोर संतुलित राहील, याकडे पाकिस्तानचे लक्ष आहे.