न्यूयॉर्क : लोकशाही (Democracy) म्हणजे काय, हे भारताला कोणी सांगायची गरज नाही, असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे (United Nations Security Council) अध्यक्षपद आले असून भारताच्या वतीने कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार आहेत.
भारताकडे एक महिन्यासाठी सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आले आहे. दहशतवादविरोध (Counter Terrorism) आणि जागतिक बहुस्तरीय यंत्रणेत सुधारणा हे दोन मुद्दे भारताच्या अजेंड्यावर असून त्यांना केंद्रस्थानी ठेवून या महिनाभरात विविध बैठकांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा एक महिना संपतानाच सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य म्हणूनही भारताचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रुचिरा कंबोज यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
भारतातील लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला असता, भारत ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे. भारतात लोकशाहीची मुळे अडीच हजार वर्षांपूर्वीच रुजली आहेत. आम्ही प्रथमपासूनच लोकशाही देश आहोत. आधुनिक काळातही विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे चारही स्तंभ भारतात मजबूत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.