पेट्रोल टँकरचा अपघात, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी; अचानक झाला स्फोट अन् 94 जणांचा मृत्यू
नायजेरियात एक मोठी दुर्घटना घडली असून पेट्रोल टँकरच्या स्फोटात 94 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एजन्सीच्या अहवालानुसार, स्फोटात 50 लोक गंभीर जखमी झाले आहेत. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या स्फोटाची ही घटना उत्तर नायजेरियातील जिगावा राज्यातील एका गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. स्फोट झाला तेव्हा टँकरमधून पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
जिगावा राज्यात मध्यरात्रीनंतर हा स्फोट झाला जेव्हा विद्यापीठाजवळील महामार्गावर टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, असे पोलिस प्रवक्ते लावन ॲडम यांनी सांगितले. यानंतर टँकर उलटला आणि लोकांनी इंधन घेण्यासाठी वाहनाकडे धावले. नेमकं इंधन गोळा करत असतानाच स्फोट झाला तेव्हा स्थानिक लोक उलटलेल्या टँकरमधून इंधन काढत होते. स्फोटानंतर टँकरला भीषण आग लागली आणि 94 जणांचा जागीच मृत्यू झाला.
जिगाव पोलिसांच्या प्रवक्त्याने याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नायजेरियातील बहुतांश अपघात हे बेपर्वा वाहन चालवणे आणि खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, ज्यामध्ये किमान 48 लोक ठार झाले.
नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, एकट्या 2020 मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची 1500 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले. इंधनाच्या टँकरच्या अपघातानंतर, लोक त्यांच्याकडून पेट्रोल गोळा करण्यास सुरवात करतात, त्यामुळे स्फोटात मृतांची संख्या वाढते. नायजेरिया सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. तिथे पेट्रोलचे दर खूप जास्त आहेत.