तेल अवीव- संपू्र्ण जगाला हादरवून टाकणार्या भूकंपानंतर सध्या तुर्कस्थान आणि सीरियात शोकमग्न (Turkey-Syria Earthquake) अवस्था आहे. या भूंकपामुळं या दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालय. सध्या मृतांचा आकडा 5 हजारांवर पोहचला असला तरी या भूकंपात 20 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. इमारती, रस्ते यांचंही अतोनात नुकसान झालेलं आहे. अशा स्थितीत जगभरातून या दोन्ही देशांसाठी मदतीचे हात आता पुढे येतायत. अशा स्थितीतही सीरियाचा देशाभिमान जागृत आहे. भूकंपानतंर इस्रायलची (israel) मदत मागितल्याचा दावा सीरियानं फेटाळून लावला आहे. तुर्कस्थानात झालेल्या भूकंपाचा फटका सीरियालाही बसलाय. शेकडो जण मृत्युमुखी पडलेत. तर हजारो जखमी झालेत. मात्र अशा संकटातही शत्रूंकडून मदत नको, या भूमिकेवर सीरिया ठाम आहे.
1948 पासून इस्रायल आणि सीरिया आणि अरब देशांत वाद सुरु आहे. इस्रायल अस्तित्वात आल्यापासून सातत्यानं शेजारील अरब राष्ट्रांशी हा संघर्ष सुरु आहे. 1967 साली झालेल्या 6 दिवसांचं भीषण युद्ध जगानं पाहिलंय. यात इस्रायलनं एकट्याच्या जीवावर मध्य पूर्व अरब राष्ट्रांचा नकाशाच बदलून टाकला होता.
भूकंप झाल्यानंतर सीरियानं मदत मागितल्याचं इस्रायलनं म्हटलं होतं. त्यानंतर मदत देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यासाठी मंजुरी दिल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र सीरियाच्या एका अधिकार्यानं अशी कोणतीही मदत मागितली नसल्याचं स्पष्ट केलंय.
गेली अनेक दशकं ज्या दे़शानं सीरियन नागरिकांची हत्या केली आहे, त्यांच्याकडे सीरिया देश मदत का मागेल, असा सवाल सीरियाच्या अधिकार्यानं विचारला आहे. सीरियाची इस्रायलला मान्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 1948 पासून या दोन्ही देशांत अनेकदा युद्धही झालेली आहेत.