Texas flash floods July 2025 : अमेरिकेतील टेक्सास राज्यात भीषण पुरामुळे प्रचंड हाहाकार माजला आहे. ग्वाडालुपे नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १५ बालकांचाही समावेश आहे. पुरामुळे अजूनही अनेक नागरिक बेपत्ता आहेत. बचाव पथकांनी आतापर्यंत ८५० जणांचे प्राण वाचवले असून, अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हवामान विभागात कर्मचाऱ्यांच्या कपात केल्यामुळे या संकटाची पूर्वसूचना योग्यप्रकारे मिळाली नाही, असा आरोपही काही तज्ज्ञांनी केला आहे.
ग्वाडालुपे नदीला महापुराचा तडाखा
शुक्रवारी टेक्सासमधील हिल कंट्री भागात प्रचंड मुसळधार पाऊस झाला. अवघ्या काही तासांत महिन्याभराचा पाऊस कोसळला, त्यामुळे ग्वाडालुपे नदीची पातळी २९ फूटांनी वाढली. परिणामी, नदी परिसरातील अनेक गावं आणि वसाहती पाण्याखाली गेल्या. पूराच्या वेळी कॅम्प मिस्टिक समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या २७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. याशिवाय, ८ मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही, त्यातही तीन लहान मुलांचा समावेश आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक या नागरिकांचा शोध घेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit : ब्राझीलमध्येही ऑपरेशन सिंदूरचा गवगवा; रिओ दि जानेरोमध्ये PM मोदींचे भव्य स्वागत
हवामान विभागाच्या इशाऱ्यांची मर्यादा
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने काही दिवसांपूर्वी केवळ मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर येईल, याची कोणतीही आगाऊ सूचना देण्यात आली नव्हती. यामुळे नागरिकांना वेळेत सावधगिरी बाळगता आली नाही. अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, “या संकटाचा अचूक अंदाज लावण्यात यंत्रणा अपयशी ठरली.” त्यांनी याबाबत पुढे स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हवामान विभागाच्या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तो अद्याप अपूर्ण आहे.
हवामान कर्मचाऱ्यांमध्ये कपात: संकटाचा मुळातला मुद्दा?
NOAA (नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन) चे माजी संचालक रिक स्पिनराड यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “ट्रम्प प्रशासनाने हवामान विभागातील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या आहेत, त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “टेक्साससारख्या राज्यात या पावसाचा अचूक अंदाज न लागणे ही कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे तयार झालेली कमतरता असू शकते.” या घटनेनंतर नागरिक हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवतील की नाही, यावरही प्रश्न उपस्थित झाला आहे.
ट्रम्पकडून आपत्ती घोषणेची शक्यता
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, “मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आपत्ती घोषणेवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली आहे. त्या घोषणेमुळे संघीय मदतीचा मार्ग खुला होईल आणि पुरामुळे पीडित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.” व्हाइट हाऊसकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
मानवनिर्मित निर्णय नैसर्गिक आपत्ती अधिक गंभीर करतात?
टेक्सासमधील पुरामुळे मानवी हानी आणि आर्थिक नुकसान अफाट झाले आहे. यामध्ये हवामान यंत्रणांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कपात आणि यंत्रणांच्या अपयशाचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून आले आहेत. नैसर्गिक आपत्तींची पूर्वकल्पना आणि योग्य नियोजन नसल्यास संकट अधिक गडद बनते, हे या घटनांवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांचा या परिस्थितीतील सहभाग, याबाबत अमेरिकेत आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे.