सणासुदीच्या काळात कार उत्पादक विक्रेते ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यातील विक्री ही कार उत्पादकांसाठी तितकीशी चांगली नव्हती. हे एका डेटातून समोर येत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने आज प्रसिद्ध केलेल्या ताज्या विक्रीच्या डेटा नुसार , आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील प्रवासी कारच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत प्रवासी कार विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात एकूण 3,18,805 कार विकल्या गेल्या होत्या. 2024 मध्ये याच तिमाहीमध्ये 3,96,498 कार विक्री केली गेली होती.
ही विक्रीमधील मंदी केवळ प्रवासी कार पर्यंतच मर्यादित नव्हती तर डेटानुसार माल वाहक वाहनांच्या विक्रीमध्येही घट दर्शविली गेली आहे. माल वाहक वाहनांची विक्री ही या कालावधीमध्ये 15.8 टक्क्यांनी घसरली . या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये, 69,514 मालवाहक वाहनांची विक्री झाली, तर मागील वर्षी याच कालावधीत मालवाहक वाहनांची विक्री ही 82,538 युनिट्स झाली होती.
हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे. मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत या विभागात 10.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 1,26,370 हलकी व्यावसायिक वाहने विकली गेली, जी मागील वर्षी याच कालावधीत 1,53,927 युनिट्स विक्री केली गेली होती. ऑटोमोबाईल उद्योगाच्या विविध विभागांमध्ये ही सातत्यपूर्ण असलेल्या घसरणीमुळे कार उत्पादकांसमोर आव्हान आहे. येत्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या सणासुदीच्या काळात क्षेत्राची कामगिरी सुधारणे आवश्यक आहे.
दुचाकी विक्रीमध्ये कमालीची तेजी
प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये घट झाली तरीहीदुचाकींच्या विक्रीत जबरदस्त कामगिरी दिसून येत आहे. दुचाकीमध्ये स्कूटरच्या विक्रीमध्ये दुसऱ्या तिमाहीत 16.9 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे, यावर्षी जुलै ते सप्टेंबरमध्ये झालेली स्कूटरची विक्री ही 18.32 लाख युनिट्स इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ही विक्री 15.67 लाख युनिट्स इतकी होती. बाईक विक्रीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीत बाईक विक्रीमध्ये 10.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तब्बल 32.09 लाख युनिट्स या बाई्क्सची विक्री या तिमाहीत केली गेली आहे. तर मागील वर्षी या कालावधीच 29.13 लाख युनिट्सची विक्री झाली होती.
ई रिक्षां विक्रीबाबत निराशाजनक कामगिरी
या विक्रीमध्ये सर्वातजास्त धक्कादायक आहे ते इलेक्ट्रिक रिक्षाच्या विक्रीत झालेली घसरण. इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत असताना जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ई-रिक्षा विक्रीत मोठी घट झाली आहे. याकालावधीत ई-रिक्षाची विक्री 30.7 टक्क्यांनी घसरली, गेल्या वर्षी या तिमाहीत ई रिक्षाच्या 10,430 युनिट्सची विक्री झाली होती ती यावर्षी केवळ 7,227 युनिट्सची विक्री झाली आहे.
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीतील भारतीय ऑटोमोबाईल बाजाराची कामगिरी लक्षात घेतल्यास प्रवासी कार आणि व्यावसायिक वाहने, ई रिक्षा यांसारख्या प्रमुख विभागांमध्ये मोठी घट झाली आहे, मात्र स्कूटर आणि बाईक विक्रीमध्ये जबरदस्त प्रदर्शन पाहण्यास मिळते.