फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महिंद्रा थार रॉक्स ( Mahindra Thar Roxx ) कंपनीने ऑगस्ट महिन्यामध्ये लॉंच केली. मात्र याची डिलेव्हरी सुरु झाली नव्हती. आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे की कंपनीने ही SUV आपल्या पहिल्या ग्राहकाला दिली आहे. महिंद्रा थार रॉक्स कारचा पहिला ग्राहक हा फार खास आहे आणि त्यासाठी या ग्राहकाने करोडो रुपये मोजले आहेत. मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक आकाश मिंडा हे या कारचे पहिले ग्राहक ठरले असून त्यांनी लिलावाद्वारे कारचे पहिले युनिट खरेदी केले आहे. दिल्लीतील महिंद्रा डीलरशिपकडून आकाश मिंडा यांना नंबर प्लेट 001 असलेली पहिली महिंद्रा थार रॉक्स वितरित करण्यात आली आहे.
आकाश मिंडा यांनी लिलावाद्वारे तब्बल 1.31 कोटी रुपयांना महिंद्रा थार रॉक्सचे पहिले युनिट खरेदी केले आहे. 2020 साली आकाश मिंडा यांनी थारचे 3 डोअर मॉडेल देखील लिलावामध्ये विकत घेतले होते. त्यावेळीही त्यांना या गाडीसाठी 001 नंबर प्लेटही देण्यात आली होती. त्यामुळे सलग दोन वेळा आकाश हे थारचे पहिले ग्राहक ठरले आहेत.
महिंद्रा थार रॉक्सच्या या पहिल्या युनिटमध्ये नेमके काय आहे खास ?
थार रॉक्सचे पहिले युनिट हे पूर्ण लोड केलेले AX7 L स्वयंचलित 4X4 डिझेल मॉडेल आहे. या युनिटमध्ये अनेक लक्झरी वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये लेव्हल-2 एडीएएस प्रणाली, प्रीमियम हरमन कार्डन साऊंड सिस्टम, हवेशीर जागा, इत्यादींचा समावेश आहे. महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये पहिल्या युनिटचा एक विशेष बॅज लावला आहे. ज्यामध्ये कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्या स्वाक्षरीसह ’01’ क्रमांक लिहिलेला आहे.
25 लाखांवरुन 1 कोटींपेक्षा अधिकची बोली
15 आणि 16 सप्टेंबर रोजी महिंद्रा थार रॉक्सच्या पहिल्या युनिटचा लिलाव झाला होता, ज्यामध्ये कारची सुरुवातीची किंमत ही 25 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र अवघ्या 24 तासांत ही बोली 1 कोटींहून अधिक झाली. या लिलावाच्या कार्यक्रमामध्ये 10,980 पेक्षा जास्त नोंदणी झाली, जी मागील थार 3-डोर मॉडेल लिलावाच्या जवळपास दुप्पट आहे.
लिलावातून जमा झालेला निधी फाउंडेशला
पहिल्या थार रॉक्सच्या लिलावातून मिळालेला निधी हा नंदी फाउंडेशनला दान केला जाणार आहे. हे फाउंडेशन भारतातील शेतकरी आणि मुलींचे जीवन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
महिंद्रा थार रॉक्स ( Mahindra Thar Roxx) इंजिन पर्याय
महिंद्रा थार रॉक्स ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल चा समावेश आहे. लिलावासाठी ठेवण्यात आलेले कारचे युनिट हे 2.2-लिटर डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 172bhp पॉवर आणि 370Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि कमी रेंजसह 4-व्हील ड्राइव्ह सिस्टिमचा समावेश आहे. 3 ऑक्टोबर रोजी बुकिंग सुरू झाल्यावर, त्यात प्रचंड रस दिसून आला, केवळ एका तासात 1.76 लाख युनिट्सचे बुकिंग झाले होते. हे विक्रमी बुकिंग होते.
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि महिंद्रा थार रॉक्सचे पहिले ग्राहक आकाश मिंडा यांनी या प्रतिष्ठित SUV चा वारसा बळकट करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी या लिलावावर बोलताना सांगितले की, हे एक माध्यम आहे जे मानवतेसाठी फायदेशीर आहे.