फोटो सौजन्य - Social Media
भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांचे आघाडीचे उत्पादन करणारी कंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड हिने आज देशातील नामांकित एनबीएफसी व मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आयआयएफएल समस्त फायनान्स लिमिटेड (आयएसएफएल) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सहयोगाद्वारे शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना संघटित व किफायतशीर वित्तपुरवठा मिळणार असून, इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ होणार आहे.
हा उपक्रम सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कराराअंतर्गत आयएसएफएल कायनेटिक ग्रीनच्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी अधिकृत वित्तपुरवठादार म्हणून कार्य करेल. कंपनीच्या १३ राज्यांतील ३७० शाखांमार्फत मोठ्या प्रमाणावर रिटेल फायनान्सिंग सोल्यूशन्स दिले जातील. यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह एकूण १३ राज्यांचा समावेश आहे.
या भागीदारीतून कायनेटिक ग्रीनला आयएसएफएलचे २ लाखांहून अधिक पूर्व-पात्र ग्राहकवर्ग उपलब्ध होणार आहेत. यासोबतच संयुक्त मार्केटिंग उपक्रम आणि को-ब्रँडेड मोहिमा राबवून इलेक्ट्रिक वाहनांच्या उपलब्धतेला चालना दिली जाणार आहे. कायनेटिक ग्रीनने आजवर १.५ लाखांपेक्षा जास्त ईव्ही विक्री करून मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीचे ई-लुना ई२डब्ल्यू, ई-झुलु स्कूटर आणि ई३डब्ल्यू कार्गो सारखे लोकप्रिय मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत.
या कराराबाबत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व सीईओ डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या,
“भारतभरातील लोकांसाठी शुद्ध गतीशीलतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आयआयएफएल समस्त फायनान्ससोबत सहकार्य करताना आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सोयीस्कर वित्तपुरवठ्यामुळे अर्ध-शहरी व ग्रामीण ग्राहकांनाही हरित वाहतुकीचा लाभ घेता येईल.”
आयएसएफएलचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटेश एन. म्हणाले, “आम्ही वंचित समाजघटकांना परवडणाऱ्या कर्जाद्वारे सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. कायनेटिक ग्रीनसोबतचा हा उपक्रम हरित वाहतूक आणि आर्थिक सक्षमीकरण यांचा संगम घडवेल.” कायनेटिक ग्रीन आणि आयएसएफएल यांचा हा सहयोग भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे शाश्वत गतीशीलतेकडे देशाची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.