फोटो सौजन्य: iStock
भारतात रोज मोठ्या संख्येने बाईक्स विकल्या जातात. काही जण हाय परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक्स विकत घेणं पसंत करतात तर काही बजेट फ्रेंडली बाईक्सला प्राधान्य देतात. बाइक घेतल्यावर तिला मेंटेन करणे सुद्धा महत्वाचे असते. जर तिला योग्यरीत्या मेंटेन केले नाही तर बाईकमध्ये हळूहळू काही खराबी दिसू लागतात.
बाईक अनेक गोष्टींमुळे चालते. यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाईकचा टायर. बाईकच्या टायरमध्ये उत्तम ग्रीप असणे महत्वाचे असते. हीच ग्रीप आपल्या बाईकला निसरड्या वाटेवरून योग्यरीत्या चालण्यास सक्षम करते.
हे देखील वाचा: ‘या’ 4 कारणांमुळे कारचे स्टेअरिंग होऊ लागते व्हायब्रेट, वेळेत करा दुरुस्ती
काही वेळेस तर नवीन बाईक असून सुद्धा फक्त निष्काळजीपणामुळे बाईकचे टायर वेळेपूर्वी खराब होतात. हे कोणत्या कारणांमुळे घडते आणि कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन बाईकच्या टायरची कंडिशन तुम्ही सुधारू शकता.
जर तुम्हाला बाईकच्या टायर चांगले ठेवायचे असेल तर टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणे हा सर्वात सोपा उपाय आहे. जर तुम्ही बाईकच्या टायरमध्ये हवेचा दाब योग्य राखला नाही तर त्यामुळे टायरचे आयुष्य तर कमी होतेच पण बाईक चालवताना घसरण्याचा धोकाही वाढतो. याशिवाय बाईक चालवण्यावरही वाईट परिणाम होतो. कमी हवेमुळे, इंजिनला अधिक क्षमतेने काम करावे लागते, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि बाईकचे मायलेज कमी होते. बाईकमधील हवेचा प्रेशर कंपनीच्या सूचनेनुसार ठेवण्याचा प्रयत्न करा.
बाईक चालकासह फक्त एक दोन लोकांसाठी डिझाइन केलेली आहे. जर तुम्ही बाईकवर दोनपेक्षा जास्त प्रवाशांसोबत प्रवास करत असाल किंवा बाईकवर भरपूर सामान घेऊन जात असाल तर त्याचा टायरवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे बाईकवर क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा प्रवासी घेऊन प्रवास न करण्याचा प्रयत्न करा.
बाईक कधीही थेट उन्हात पार्क करण्याचे टाळा. यामुळे पेंटचे नुकसान तर होतेच पण टायर सुद्धा लवकर खराब होतात. बाईकच्या टायर्सची कंडिशन सुधारण्यासाठी, नेहमी सावलीच्या ठिकाणी किंवा पार्किंग क्षेत्रात बाइक पार्क करण्याचा प्रयत्न करा. यामुळे टायरवर थेट ऊन पडणार नाही, ज्यामुळे टायरचे रबर लवकर सुकणार नाही.
कारप्रमाणेच, बाईकच्या टायर्सचे आयुष्य वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या अलाइनमेंटची काळजी घेणे. बाईकच्या चाकांचे अलाइनमेंट वेळेवर केले तरी टायरची कंडिशन सुधारता येऊ शकते.
तरुणांना बाईक चालवण्याची खूप आवड आहे. अनेक तरुण त्यांच्या बाईक्स भरधाव वेगात चालवतात आणि त्यांना स्किड करतात. असे केल्याने टायरचे रबर घासू लागते. असे केल्याने अपघाताचा धोकाही वाढतो. म्हणून, एका मर्यादित स्पीडमध्ये बाईक चालवण्याचा प्रयत्न करा.