नितीन गडकरींच्या वक्तव्यानंतर देशात डिझेल कार्स बंद होणार? जाणून घ्या
भारतात खूप कमी असे नेते आहेत जे फक्त आपल्या नावामुळे नाही तर कामामुळे सुद्धा ओळखले जातात. अशा नेत्यांना लोकांकडून सुद्धा भरभरून प्रेम मिळते. यातील एक नेते म्हणजे देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी. नितीन गडकरी त्यांच्या कामांमुळे नेहमीच चर्चेत असतात, परंतु आता ते चर्चेत आले आहे ते त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे. या वक्तव्याने डिझेल कार मालकांची झोप उडवली आहे.
आजच्या काळात देशातील बहुतांश कार्स या पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. पण आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सुद्धा वाढत आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने डिझेल गाड्या चालवणाऱ्या लोकांचे टेन्शन वाढले आहे. विशेषत: ज्यांनी नुकतीच डिझेल कार खरेदी केली आहे ते अधिक काळजीत आहेत.
डिझेल कार मालक टेन्शन मध्ये यायचा कारण म्हणजे नितीन गडकरी यांचं डिझेल कार्सविषयीचं एक महत्वाचा वक्तव्य. गडकरी म्हणाले,”पुढील 10 वर्षात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर पूर्णपणे बंदी आणायची आहे.”
रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कमी प्रदूषण करणाऱ्या कार्स वापरण्यावर भर देत असतात. तसेच नागरिकांना या कार्स वापरण्याचा आग्रह देखील ते करत असतात. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार्समुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे आपले आरोग्य सुद्धा बिघडू शकते. म्हणूनच नितीन गडकरी इथेनॉलवर चालणाऱ्या कार्सना सपोर्ट करत असतात. यासोबतच देशात इलेक्ट्रिक कार्सची विक्री कशी वाहदवता येईल याबाबत सुद्धा केंद्रीय मंत्री विचार करत असतात.
नितीन गडकरींच्या वक्तव्यानंतर ज्यांनी नुकतीच डिझेल कार घेतली आहे ते आता चांगल्याच तणावात आहेत. परंतु या सर्व गोष्टी असूनही, नवीन डिझेल कार खरेदी करणाऱ्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही, कारण सरकारने अद्याप नवीन डिझेल कारवर कोणत्याही प्रकारचा कर वाढवलेला नाही. यासाठी सरकार सध्या फक्त योजना बनवण्याच्या विचारात आहे. तसेच कारचे आयुष्य देखील सुमारे 10 ते 15 वर्षे असते, त्यामुळे नवीन डिझेल कार खरेदी करणाऱ्याला देखील याची काळजी करण्याची गरज नाही.
नितीन गडकरींनी डिझेल कारचा पर्यायही लोकांसमोर मांडला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आजच्या काळात इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. एकीकडे तुम्ही पेट्रोलवर १०० रुपये खर्च करता, तर दुसरीकडे इलेक्ट्रिक कार्सवर फक्त ४ रुपये खर्च होतात.