या आठवड्यात तेजोमयीला, पोलिओ डोस देण्याची आठवण बाबांनी आईला करुन दिली.
अहो, मी कसं विसरेन? आई बाबास म्हणाली.
काय गं आई, तू मला ही लस, ती लस कां देत राहते अधूनमधून ?
अगं, तुझी प्रकृती उत्तम रहावी. तुला कोणताही आजार होऊ नये, यासाठी. आजारी पडलं की, मग घरीच राहावं लागतं, झोपून. शाळेत जाता येत नाही की मित्र-मैत्रिणींसोबत खेळता येत नाही. बरोबर ना…
हो हो अगदी बरोबर. तेजोमयी म्हणाली.
अगं पण आई, तू माझ्या लसीसाठी इतकी आग्रही असते. त्याचं वेळापत्र पाळते. मग अलेक्झांडर (द डॉगी) ची कां बरं तुला आठवण येत नाही?
आपलं नाव कानावर पडताच अलेक्झांडर कान टवकारुन तेजोमयीकडे बघू लागला. सोफ्यावरुन उतरुन तो तिच्याकडे शेपूट हलवत आला. आता अचानक मध्येच माझा विषय कसा बॉ निघाला? असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. अलेक्झांडरची आठवण कां येत नाही? या प्रश्नाने आईही चमकली. बाबांच्या चेहऱ्यावर घाम आला. हे काय भलतच हिचं विचारणं? असं त्यांना वाटलं. काही क्षण शांततेत गेले. आपल्यावरुन या तिघांमध्ये काहीतरी गंभीर घडतय हे अलेक्झांडरच्या लक्षात आल्यानं तो आळीपाळीनं तिघांकडेही बघू लागला. त्याने आपला मोर्चा आईकडे वळवला. एरव्ही त्याचा कान हलकासा उपटून लाड करणाऱ्या आईने आपलं तोंड दुसरीकडेच वळवलं.
अगं, मी काही चुकीचं बोलले का? तेजोमयीनं आईची ही, काहीही न बोलता व्यक्त केलेली प्रतिक्रिया लक्षात घेऊन विचारलं.
नाही म्हणजे…तसं नाही गं…आई म्हणाली.
तुझं काहीच चुकलं नाही. पण…बाबा म्हणाले.
म्हणजे काही गंभीर आहे का? तेजोमयीनं विचारलं.
म्हटलं तर गंभीरच आहे. आई अलेक्झांडरला जवळ घेत म्हणाली. तिचे डोळे भरुन आले. डोळ्यातील अश्रू अलेक्झांडरच्या अंगावर पडले. त्याने झरदिशी आईकडे बघितलं. आईला कसलंतरी दु:ख झालयं हे त्याच्या लक्षात आल्यानं तो आईच्या गालाला गाल घासून तिला सांत्वना देऊ लागला. आईला हुंदका आला.
अगं पण, तू रडतेस कां? मी कुठे लस घ्यायला नकार दिला. फक्त अलेक्झांडरला लस का नाही? असं विचारलं. माझं चुकलं असेल तर सॉरी.
अगं, तू कशाला सॉरी म्हणतेस. आम्हीच दोघांनी सॉरी म्हणायला हवी. बाबा, अलेक्झांडरच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले. आई रडतेय, बाबा आपल्याला कुरवाळताहेत. आपण आज दिवसभर कोणताही दंगा केला नाही. अगदी शहाण्यासारखं वागलो तरी, आपला विषय कसा का निघाला? हा प्रश्न पुन्हा पडून अलेक्झांडर गोंधळून गेला. त्याने बाबांकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघितलं.
पण बाबा, झालं तरी काय? सांगाल का जरा? अलेक्झांडरसारखाच माझाही गोंधळ उडालाय. मला काही कळेनासं झालय. तेजोयमी म्हणाली.
अगं, तुला जशा वेगवेगळ्या लसी वेळेच्या वेळी द्यायच्या असतात तशाच अलेक्झांडरलाही द्यायला हव्यात, असं त्याच्या डॉक्टरांनी मागेच सांगितलं होतं. त्याचं वेळापत्रकही ठरवून दिलं होतं त्यांनी. कारण आपल्याला जसे आजार किंवा रोग होऊ शकतात, तसंच शेपूटवाल्या दोस्तांनांही होऊ शकतात. आपण लस घेऊन जशी काळजी घेतो, तशीच काळजी त्यांचीपण घ्यायला हवी.
अगदी बरोबर. बाबा म्हणाले. पण मी विसरले. मी याला लाडका लेक म्हणते. पण वेळ आली की तुझ्याकडेच आधी लक्ष पुरवते. ठोंब्या राहतो बिचारा बाजूला. बोलता येत नाही ना त्याला. मग तो सांगू शकत नाही, हे दुखतं ते दुखतं. औषध हवं. ते मलाच कळायला हवं. मोठीच चूक झाली माझ्याकडून रे राज्या. असं म्हणून आईने अलेक्झांडरला छातीशी कवटाळलं. बाबांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आधी आईबाबांनी अलेक्झांडरला त्याच्या डॉक्टरकडे नेऊन त्याला लस दिली…
– सुरेश वांदिले
ekank@hotmail.com