राहुल गांधींनी सावरकरांच्या विषयात महाराष्ट्राला चिडवणारी, डिवचणारी विधाने मुद्दाम करण्याची सुरुवात, त्यांच्या गाजलेल्या भारत जोडो यात्रेमधूनच केली असे नाही. याही आधी त्यांनी अनेकदा सावरकरांसंदर्भात मानहानीकारक विधाने केलेली आहेत. नव्हे; काँग्रेसने पक्ष म्हणून स्वीकारलेले ते एक धोरण आहे. पूर्वीच्या वाजपेयी सरकारच्या काळात राम नाईक हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते तेव्हा त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये एक अखंड तेवणारी ज्योत सावरकरांना समर्पित केली होती. वाजपेयींचे सरकार गेले आणि मनमोहन सिंगांचे युपीएचे सरकार सत्तेत आले तेंव्हा गांधी परिवाराचे जवळचे मानले जाणारे मणिशंकर अय्यर हे पेट्रोलियम मंत्री बनले. त्यांनी सर्वात प्रथम काय केले असेल तर सरकारी तेल कंपन्यांमार्फत सुरु असणारी अंदामानातील अखंड ज्योत विझवून टाकली. त्याचवेळी सावरकरांच्या देशभक्तीची अवहेलना करणारी मुक्ताफळे अय्यर महाशयांनी उधळली.
तेव्हा शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संतापले आणि अय्यर महाराष्ट्रात आला तर त्याला थोबडवून काढा असे आदेश सैनिकांना दिले. अय्यरच्या विरोधात तेव्हा राज्यात सर्वत्र निषेधाचे मोर्चे निघाले. त्याच्या फोटोंना जोडे मारण्याचेही कार्यक्रम झाले. त्याचीच आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच करून दिली. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधीवर नाराजी प्रकट केली व सावरकर आमचे दैवत आहे, त्यांच्याविषयीचा अपमान सहन करणार नाही असे जाहीर केले. त्याला छेद देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले की जसे बाळासाहेबांनी अय्यरला थोबडावून काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला, तसे काही उद्धव ठाकरे करतील का? अपमान सहन करणार नाही म्हणजे नक्की ते काय करणार? हे उद्धव यांनी महाराष्ट्राला सांगावे, असे एक आव्हानच शिंदेंनी ठाकरेंना दिले. पण स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाने एक धोरण म्हणून सावरकरांचा अवमान सातत्याने केला आहे. नेहरु-गांधींनीही सावरकरांच्या कार्याला अनुल्लेखाने मारण्याची कामगिरी पार पाडली. नंतर सत्तेच्या पन्नास-साठ वर्षातील काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनी सावरकरांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या पंक्तीत कसे स्थान दिले जाणार नाही हे तर पाहिलेच, पण सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात जो तीव्र संघर्ष केला त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि माफीपत्रे देऊन स्वतःची सुटका काळ्यापाण्याच्या शिक्षेतून सावरकरांनी सुटका करून घेतली, हेच देशाला ओरडून सांगायचे. हेच काम काँग्रेसने आजवर केले आहे. सावकरांचा द्वेष हेच काँग्रेस विचाराचे बळ राहिले.
काँग्रेसला हिंदू- मुसलमान ऐक्याची मांडणी ही अल्पसंख्यांकांच्या लागुनचालनाच्या अंगानेच करायची होती, तर सावरकर ऐतिहासिक दाखले देऊन मुसलमान हे कसे सातत्याने आक्रमकच राहिले आहेत, ते जिथे संख्येने अधिक होतात तिथे कसे दंगेधोपे करतात हे इतिहासाचे दाखले देऊन मांडत राहिले. अफगाणिस्तानाच्या पलिकडे हिंदुकुश पर्वतापासून ते खाली हिंदीमहासागरापर्यंतची भूमी हे खरी भारतभूमी आहे. ही आपली पितृभूमी आहे हा विचार सावरकरांचा होता. अगदी अफगाणिस्तान नाही, तरी आसेतु हिमाचल भारतभूमी ही हिंदु संस्कृतीवरच तगली, पोसली व वाढली आहे आणि हिंदुंना वगळल तर या देशाचे भवितव्य सुरक्षित नसेल हा विचार सावरकर मांडत होते.सावरकरांच्या याच विचारांचा आविष्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखंड भारताच्या स्वप्नात दिसेल, पण सावरकर आणि संघाचे अनेक बाबतीत मतभेदही राहिले आहेत आणि ते झटकन संपणारे नाहीत. सावरकर हे सनातनी हिंदुंनाही जड जाणारे प्रकरण होते. कारण ते आधी प्रखर विज्ञानवादी होते. धर्माची मांडणी राजकीय विचारातून ते करत होते. पोथी पूजेचे हिंदुत्व त्यंनाही मान्य नव्हते. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतानाही त्यांनी हरिजनांच्या मंदिरप्रवेशाचे काम सुरु केले ते सनातन्यांच्या विरोधात जाऊनच. साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि देशरक्षणासाठी बुंदुका हाती घ्या, असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून सांगणारेही सावरकरच होते.
सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुदार उद्गार काढले, असे सांगणारे काही महाभाग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पण शिवाजी राजांच्या तेजस्वी कामाची मांडणी, हिंदू विचाराच्या अंगाने करणारी, प्रखर देशभक्तीने परिपूर्ण अशी, “प्रभो शिवाजी राजा”, ही कविता विनायक दामोदर सावरकरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिली होती हे या टीकाकारांच्या गावीही नसते. सावरकरांचा थेट संघाचा संबंध कधीच नव्हता. पण राहुल गांधी आता जुना काँग्रेस विचार नव्याने मांडताना रा. स्व. संघाला तसेच भारतीय जनता पक्षाला इजा होईल या कल्पनेमधून सावरकरांवर निशाणा साधत आहेत. दक्षिण भारतात फिरून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्राच्या वरच्या कोपऱ्यातून निघून उत्तरेकडे गेली, तेव्हा त्या दहा-बारा दिवसात त्यांनी तीन- चार वेळा सावरकरांवर टीकेची झोड उठवली. त्यांना बहुधा असे वाटत होते की सावरकरांना दूषणे देण्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे राजकीय नुकसान आपण करू शकू. पण त्यांच्या या अविचारी विधानांची उलटी प्रतिक्रिया येत होती आणि आजही तशीच येते आहे.
राहूल गांधींच्या काँग्रेसने ज्यांचे नेतृत्व महाराष्ट्रात स्वीकारले ते उद्धव ठाकरे हे आता राहूल गांधींना दूषणे देत आहेत. राहुलनी तोंड सांभाळून बोलावे असे बजावत आहेत. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारचे नेते या नात्याने काँग्रेसच्या राज्यातील आमदारांचेही नेते काही काळ राहिले. या सर्व अडीच वर्षांच्या कालवधीत राहुल गांधींनी सावरकरांच्या विरोधात चकार शब्द काढला नाही. जेव्हा इथले सरकार कोसळले आणि काँग्रेसवाले बेकार झाले तेव्हा राहुल यांनी महाराष्ट्रात नांदेड-देगलूर भागातून जातात किंवा चालता चालता सावरकरांच्या नावावर चिखल ओतण्याची सुरुवात केली. खरेतर याची काहीच गरज, जरुरी वा आवश्यकता नव्हती. त्यांनी अगदी जाणीवपूर्वक आपल्या नांदेडच्या भाषणात ओढून ताणून सावरकरांना आणले. अंदमानातून सुटका व्हावी यासाठी ब्रिटिश सरकारपुढे सावरकरांनी लोटांगणे घातली अशा अर्थाची वाक्ये वापरण्यास सुरुवात केली. सावरकरांनी अंदामातच सडून झिजून मरायला हवे होते अशी बहुधा राहुल यांची संकल्पना दिसते. त्यांनी सुटकेचा मार्ग शोधला. ब्रिटिश सरकारला गाफील ठेवून ते भारतात परतले. मुंबई वा पुण्यात न राहता, फारशा सोयीसुविधा व प्रवास साधने नसणाऱ्या कोकणातील रत्नागिरी या तेव्हाच्या लहान शहरात राहण्याची अट सावरकरांनी पत्करली. तिथे कोणत्याही प्रकारे राजकीय विचार, लिखाण वा भाषणे ते करणार नाहीत असे लिहून दिले. हा एक रणनीतीचा भाग होता.
आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी प्रत्यक्ष महाराजांनाही असाच गनिमिकाव्याचा अवलंब करून बादशहाला खलिते लिहावे लागले होते. आंदोलनांसाठी ब्रिटिशांच्या तुरुंगात गेलेल्या नेहरु गंधींनीही आंदोलने संपवण्याच्या घोषणा करूनच सुटका करून घेतली होती. काँग्रेसजन हे सोयीस्कररीत्या विसरतात. काळ्यापाण्याची शिक्षा संपवून अंदमानाच्या तुरुंगातून निघून भारतात पाऊल ठेवल्यानंतर रत्नागिरीत सावरकरांनी काय केले तर त्यांनी समाजसुधारणेचे मोठे काम हाती घेतले. अस्पृश्यता संपली पाहिजे, हरिजन हे आपले बांधवच आहेत, त्यांना मंदिरात प्रवेशापासून रोखता कामा नये, ही चळवळ त्यांनी रत्नागिरीतून चावलली. हिमालयाएव्हढे कर्तृत्व असणाऱ्या वीर विनायक दामोदर सावरकरांपुढे राहुल गांधींना एखाद्या टेकाडाएव्हढीही उंची लाभलेली नाही. उद्धव यांच्याप्रमाणेच शरदरावांनीही सावरकरांचा अपमान करू नका, त्यातून महाविकास आघाडी संपुष्टात येईल असे राहुल यांना सांगितले. सावरकर नेमके कोण होते व काय होते, हे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंजवळ बसून तरी राहुल यांनी समजून घ्यायला हरकत नाही.
-अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com