
पक्षादेश डाववला, बंडखोरांची आक्रमकता! सरकार स्थापनेसाठी खलबतांचा कळस!! बंडखोरांची हाकालपट्टी, आरोप-प्रत्यारोप. राजकीय सुरुंग, सरकारला हादरे; भूकंप!!सत्ता विरोधातलं बंड आता सर्वोच्च न्यायालयात! सत्तापेच कायमच! अशा बातम्यांनी एकच सावळागोंधळ सुरू असताना त्यामागलं नाट्य शोधण्याचा प्रयत्न केल्यास क्षणोक्षणी त्यात वेगवान घटनांची थरार मालिकाच प्रकाशात येते.
हे राजकीय नाट्य आणि त्यामागला ‘सिंहासना’साठीचा ‘सामना’ काहीदा तर्कशास्त्र, युक्तीशास्त्र, नितीनियम, संस्कार यालाही थक्क करून सोडणारा… एक राजकीय विचार घेऊन होत असलेला सत्तेसाठीचा संघर्ष, लढा हा दिवसेंदिवस आपलं रूप बदलतांना दिसतो. काहीदा हा संघर्ष व्यक्ती, पक्ष, संघटना या पलीकडे जाऊन उभं समाजजीवन ढवळून काढतो.
लोकशाही मानणाऱ्या आपल्या देशात त्याभोवतीचे नाट्य काळानुरूप नाटककारांनी आपल्या संहितेतून मांडले खरे पण मराठी नाटकात राजकीय विषय हे तसे अन्य साहित्य प्रकाराच्या तुलनात्मक फार कमी प्रमाणात दिसतात; तसेच व्यावसायिक रंगभूमीवरही अभावानेच राजकीय भाष्य करणारी नाटके आलीत. राजकीय कलाकृतींमध्ये सत्तासंघर्ष आणि मूल्यसंघर्ष याला महत्व असते. नाट्यपूर्ण विषय असूनही हव्या त्याप्रमाणात राजकीय नाटके रंगभूमीवर आली नाहीत, जी आली ती नाममात्रच.
करमणूकप्रधान नाटकांनाच प्राधान्य मिळालंय. ‘रसिकांची मागणी तसा पुरवठा’ झालाय. त्यातून कुठेतरी विषयातील राजकीय वास्तवतेचे भान हरवलेले दिसते. कीचकवध, घाशीराम कोतवाल, पुरुष, शोभायात्रा, गांधी-आंबेडकर, मी नथुराम गोडसे बोलतोय, इंदिरा, माकड, झुंड, छावणी – ही नाटके राजकीय कथाबीज म्हणून लक्षवेधी ठरलीत. एका वळणावरला हा रंगप्रवासच. एका दमात अशा नाटकांचा आढावा घेता येणं शक्य नाही, पण तरीही त्यातील काही ठळक नाटकांवर एक प्रकाशझोत…
सतीश आळेकर, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, रत्नाकर मतकरी, प्रेमानंद गज्वी हे नाटककार १९६० नंतर राजकीय विषय मांडणारे ठरले. ‘गोपू’ हे एकमेव असे नाटककार आहेत की ज्यांच्या नाटकातून कायम राजकीय भाष्य दिसले. समाजाकडे बघताना गंभीरपणे बघण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. प्रायोगिक नाटककार म्हणून त्यांच्यावर जरी शिक्का बसला असला तरीही व्यावसायिक मुल्ये त्यांच्या नाटकात आहेत. धर्मशाळा, सत्यशोधक या नाटकांचे प्रयोग गाजले. ‘आधुनिक नाटक’ म्हणूनही त्याकडे बघितले गेले. विचार नाट्य, चर्चा नाट्य म्हणून ते लक्षवेधी ठरले.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे १९०७ साली रंगभूमीवर आलेलं ‘कीचकवध’ हे नाटक. महाभारतातील कथेवरून बेतलेले तसे रूपकनाट्य. ब्रिटिश सरकारचा तो काळ. त्यावेळी या नाटकाने इंग्रजांना अक्षरशः हादरून सोडले. अखेर ‘राजद्रोही नाटक’ म्हणून त्यावर बंदी घातली गेली. ‘कीचकवध’ म्हणजे गव्हर्नर लॉर्ड कर्झन आणि सैरंध्री म्हणजे जनता. युधिष्ठिर म्हणजे मवाळ आणि भीम म्हणजे जहाल विचारांचे. अशा व्यक्तीरेखांना अर्थ देऊन एक विचारनाट्य खाडिलकरांनी उभे केले. राज्यकर्ते तसेच जनता यावरलं भाष्य प्रभावी. त्याकाळातले हे प्रासंगिक प्रायोगिक नाट्य म्हणून सिद्ध झाले.
‘कीचकवध’प्रमाणे राजकीय आणि तत्कालीन परिस्थिती मांडणारे नाट्य म्हणजे गोविंदराव टेंबे यांचे संगीत ‘पट-वर्धन’. विषय अर्थातच द्रौपदी वस्त्रहरणाचाच. राम गणेश गडकरी यांचे ‘राजसंन्यास’ हे नाटक. जे अपूर्ण लिहीले गेले होते. पुढे ते बाळ कोल्हटकर यांनी त्याला पूर्णत्व दिले आणि प्रयोगही दिमाखात केलेत. संभाजीराजांचा एक आलेखच त्यात मांडला आहे. मराठेशाहीचा असलेला जिरेटोप राजारामांसाठी देतांना राजे म्हणतात, ‘राजा हा म्हणजे जगाचा उपभोगशून्य स्वामीच असतो!’ – हे बोल आजच्या राजकारण्यांना खूप काही सांगून जाणारे. शिकवण देणारे.
नाटककार जयवंत दळवी यांचे गाजलेले ‘पुरुष’ नाटक. १९८२ च्या सुमारास रंगभूमीवर आलेलं. त्यातला गुलाबराव हा टिपिकल राजकारणी चेहरा. जो नाना पाटेकर यांनी क्रूरतेनं साकार केलेला. त्याच्यासमोर रिमा लागू हिची अंबिका. जी बलात्कारानंतरही न्यायासाठी धडपड करणारी. गुलाबरावाचे ‘पुरुषी शस्त्र’ नष्ट करण्यापर्यंत जाणारी. एका राजकीय पुरुषी प्रवृत्तीवरच यातील संहितेने प्रहार केलेला. काही उपकथानके या नाट्यात जरूर आहेत पण राजकीय दुष्टशक्तींचा मुकाबला हादरून सोडणारा. ज्याची पार्श्वभूमी महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांशी योगायोगानं जुळून येणारी आहे.
राजकीय नाट्य समर्थपणे साकार करणारे नाटककार विजय तेंडुलकर आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाट्य. संहिता आणि सादरीकरणात एक वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार ठरले. आजच्या ढासळत्या, नितीशून्य राजकारण्यांचे दर्शन हे शफायत खान यांच्या ‘शोभायात्रा’ या नाट्यातून होते. तर राजकीय वैचारिक संघर्ष हा दोन दिग्गज नेत्यांच्या संवादातून ‘गांधी-आंबेडकर’ यातून प्रेमानंद गज्वी यांनी उभा केलाय. पण ही नाटके फक्त महाविद्यालयीन अभ्यासापूर्ती शिल्लक राहिली.
प्रेमानंद गज्वी यांचे ‘छावणी’ हे नाट्य हे राजकीय विचार करण्यास प्रवृत्त करणारे. जे सात-आठ वर्षे सेन्सॉरच्या कचाट्यात अडकले होते, अखेर त्याचे काही प्रयोग रंगमंचावर सादर झाले.
चैतन्य सरदेशपांडे यांचं २०१८ च्या सुमारास रंगभूमीवर आलेलं ‘माकड’ हे नाट्य. निवडणुकीत होणारा पैशाचा अतिरेक यावर बेतलेले यातील कथानक. राजकारण्यांचे कूळ आणि मूळ त्यात शोधण्याचा प्रयत्न होता. निवडणुकीतील भ्रष्ट यंत्रणा आणि दुसरीकडे सत्तेवर आल्यानंतरचा कैफ. हे नाट्यपूर्ण चित्रण त्यात होते.
संतोष पवार यानेही ‘यदाकदाचित’पासून नाट्यसृष्टीत आपला स्वतःचा हक्काचा रसिकवर्ग आणि स्वतंत्र शैली आकाराला आणली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ किंवा ‘हौस पुरवा माझी’ या रंगभूमीवर सुरू असलेल्या त्यांच्या नाटकात राजकारण्यांवर त्यांच्या मनोवृत्तीवर भाष्य दिसते. त्यांची खिल्ली उडवून जागं करण्याचा प्रयत्नही त्यामागे आहे. ‘पवारांची पॉवर’ नव्या रसिकांना भारावून सोडतेय. दादा कोंडके यांची ‘विच्छा’ तर उत्स्फूर्तता तसेच प्रासंगिकता असल्याने राजकारणी मंडळी प्रयोगाला हजेरी लावायचे.
मराठी नाटकांपेक्षा चित्रपटात ‘राजकीय’ कथानके शेकडोंनी आलीत. त्यात ‘सामना’, ‘सिंहासन’,वजीर, ‘तोतया आमदार’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘सरकारनामा’, ‘धुरळा’ ही यादी न संपणारी. ‘बाई संध्याकाळी वाड्यावर या!’ हा पाटलाचा आदेश परवलीचा. संवादात सुपरहिटच! निळू फुले यांचा राजकारणी बनेल नेता ही प्रतिमा रसिकांनी मान्यच केली, अपवाद ठरले ते ‘सामना’तील मास्तर आणि ‘सिंहासना’तील दिगू पत्रकार! रंगभूमीवर त्यांचा जयवंत दळवी यांच्या ‘सूर्यास्त’ नाटकातील स्वातंत्र्यसैनिक आप्पाजी गाजला. खलनायकी असणारी त्यांची ओळख या नाटकामुळे ‘निष्ठावान गांधीवादी चळवळीतला कार्यकर्ता’ म्हणून रसिकांच्या पसंतीला उतरली.
महाराष्ट्रातील एक बेताल राजकारणी मुखवटा म्हणजे गुलाबराव. जो ‘पुरुष’ नाटकात जे विचार मांडतो. ते नाटकाप्रमाणे प्रत्यक्ष राजकारण्यांमध्ये ही आजही फिट्ट बसणारे आहेत. गुलाबराव म्हणतो,“शेवटी ज्याच्या हाती ससा, तोच पारधी! आम्ही सारी राजकारणी माणसं. हायकमांडने माझी चौकशी केली. जो झाला तो माझ्या चारित्र्यहननाचा प्रकार होता. हे हायकमांडच्याही लक्षात आलं. मला काय इलेक्शनचं तिकीट मिळून गेलंय. तुम्ही कोर्टात गेला नसता तर येवढं रामायण घडलं नसतं… संध्याकाळी बंगल्यावर या.”
ता.क.- शिवाजी मंदिराच्या कट्टयावर भरपावसात राजकारणावर गप्पा रंगल्या होत्या. आजच्या राजकीय परिस्थितीवर एखादं चांगलं नाटक सुपरहिट होईल या निष्कर्षापर्यंत सारेजण पोहचले. एका नवोदित नाटककाराने पिल्लू सोडले. तो म्हणाला, माझ्या नव्या नाटकाचे नाव ‘फडणवीस-शिंदे!’ तो पुढे म्हणाला – ‘अहो, इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या दोघांनी एकत्रपणे महाराष्ट्रात चक्क वीस वर्षे राज्य कारभार केला होता!’
शिवाजी मंदिरच्या ‘गप्पा कट्टा’ अक्षरश: उडालाच!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com