संगीतरत्न पं. कुमार सुरूशे यांचे ‘भारतीय अभिजात संगीत आणि संस्कृती’ हे डिंपल प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक. ३५६ पृष्ठांच्या मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांत विभागलेल्या या पुस्तकात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास, संगीत पद्धतीचे नियम आणि निरनिराळ्या रागांच्या स्वरलेखनाचे कार्य समाजावून देतानाच संगीतामधील निरनिराळी घराणी, त्यांच्या पारंपरिक बंदिशी, त्या त्या घराण्यातील ज्येष्ठ गायक, वादक आणि त्या त्या घराण्यानुसार गानपद्धत, वादन पद्धत, शैली, आलापी, बोल, तान, तानप्रकार, स्वर लगाव, ठहराव, लयकारी यांची वैशिष्ट्ये समजावून दिली आहेत.
महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या प्रशासकीय विभागातून निवृत्त झालेले व साडेतीन दशकाहून अधिक काळ शास्त्रीय संगीताची साधना करणारे पंडित कुमार सुरूशे यांनी सखोल अभ्यास करून, विविध तज्ज्ञांशी चर्चा करून या पुस्तकाची रचना केली आहे.
संगीताच्या उत्पत्तीसंदर्भात माहिती देताना पंडित सुरूशे जंगलातील पशुपक्ष्यांच्या नादापासून गान-संगीताच्या उत्पत्तीची मुहूर्तमेढ रोवली हे सांगतात. दामोदर पंडित यांचा सात स्वरांचा दाखला ते देतात. मराठी विभागात भारतीय अभिजात संगीताचा संक्षिप्त इतिहास ते शास्त्रीय संगीत प्रसार व प्रचाराचा आधुनिक काळ असा परामर्ष घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील बारा प्रकरणांत मनुष्याचे आजार, त्याची कारणे, निसर्गोपचार, मानवी शरीरातील सप्तचक्रे व त्यांच्या कंपनलहरी व लाभदायक संगीतोपचाराबाबतची महत्त्वाची माहिती आहे.
मान्यवरांचे संगीतोपचाराचे अनुभव व रोगाचा प्रतिकार करण्यासाठी संगीत उपचारपद्धती समजावून देताना प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. के. राममूर्ती यांची मुलाखत त्यांनी घेतली आहे.
हिंदी विभागात शास्त्रीय संगीतातील मान्यवर गायक तसेच वादकांचा त्रोटक परिचय करून दिला आहे. शास्त्रीय संगीताचे दर्दी असणाऱ्यांसाठी तसेच शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांसाठीही खूपच उपयुक्त माहिती आहे. उस्ताद अमीर खुसरो ते पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया अशा जवळपास सव्वीस मान्यवरांचा परिचय वाचताना त्यांची शैली, गायकीची घराणी, परंपरा यांची माहिती मिळते.
संगीत हे सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद देणारे माध्यम आहे. गायक जसा संगीतातून घडतो तसेच सामान्य माणूसही आत्मिक शांतीसाठी संगीताचा अनुभव घेतो. संगीत ऐकणे ही केवळ कर्णआनंदाची शारीरिक पातळीवरची प्रक्रिया नसून त्यात मानसिक आणि बौद्धिकतेचाही समावेश होतो. त्यामुळेच भौतिक दु:खे, संताप यातून काही वेळ का होईना माणसाला आराम मिळतो.
संगीतात निर्माण होणाऱ्या तरंग लहरींमुळे सभोवतालचे वातावरण नादमय होऊन जाते. त्यामुळेच मानसिक व शारीरिक आजारांवर संगीत हे उपचार ठरू शकते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपचार म्हणून ‘म्युझिक थेरपी’द्वारा माणसाला वेदनामुक्त करू शकते. पंडित सुरूशे यांनी आपल्या रियाजातून चिंतन, मनन व अभ्यासातून अथक परिश्रम घेऊन मनाच्या विविध अवस्थांवर शास्त्रीय वर्गीकरणानुसार आणि रागांच्या विशिष्ट वेळेनुसार कोणता राग कसा फलदायी परिणाम घडवून आणतो यासंबंधीची पूरक आणि अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी मानसशास्त्र आणि संगीतशास्त्र या दोन शास्त्रांचा मेळ घेतला आहे. नवीन गायक पिढीला भारतीय शास्त्रीय संगीताची श्रेष्ठता व उपचार पद्धती कळावी हा या पुस्तकामागील लेखकाचा हेतू आहे.
मानवी जीवनात स्वर तालाचे महत्त्व निर्विवाद आहे. संगीताने घसा, छाती, फुप्फुसाला व्यायाम मिळतो. तसेच नृत्याने सांध्यांना, गायनाने श्वासाचा दमही वाढतो हेही सर्वश्रुत आहेच.
अमेरिकेतील ३० टक्के लोक मानसिक व्याधीने ग्रासलेले असून तेथे मानसिक शांतीसाठी भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेतात व मन:शांती मिळवतात असा लेखकांचा दावा आहे. संगीताचे अध्यात्म, भावना, काव्य, व्यायाम, नाटक, विज्ञान, रस, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र या सर्वांशी अतूट नाते आहे. गांधर्ववेदात सात स्वरांच्या मिश्रणाने सर्व राग-रागिणीचे स्वरूप निश्चित झाले आहे. मानवी शरीर जसे कफ, वात, पित्त या त्रिदोषांनी बनले आहे तेच गुणधर्म स्वरांमध्ये असल्याने ‘म्युझिक थेरपी’ उपचार ठरू शकते असा निष्कर्ष पंडितजींनी मांडला आहे.
संगीत श्रवणाने न्यूरोहार्मोन्सची वाढ होऊन व्याधी दूर होतात तसेच व्याधीच्या स्थानाला प्रभावित करून शरीराची कार्यशक्ती वाढते ही कल्पना भारतीय आयुर्वेद शास्त्राची आहे. याचा संदर्भ ते आयुर्वेदाचे ग्रंथ तसेच ‘भावप्रकाश’ या ग्रंथाधारे देतात.
‘प्रत्यक्ष रोग्यांवर प्रात्यक्षिके व संशोधन करणारे महान संगीततज्ज्ञ’ हे प्रकरण फारच उद्बोधक आहे. यात किशनगडच्या अमिरचंद्रजी या गायकाने हमीर रोगाचा उपयोग हृदयरोग बरा करण्यासाठी केला. भैरव रागाने श्वास रोग बरा होतो. मालकंस रागाने क्षयावर मात करता येते तर भूपाळी राग डोकेदुखीचा आजार बरा करतो असे महान संगीतकार पंडित हरिश्चंद्रजींचा दाखला ते देतात. भारतात ब्रिटिशांच्या काळात इंग्रज अधिकारी मुसोलिनी अनिद्रेच्या रोगाने ग्रासलेले होते. पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी शास्त्रीय संगीताच्या गायनाने त्यांना रोगमुक्त केले.
संगीत हे मानवीय लय तसेच तालबद्धतेची अभिव्यक्ती आहे हे विधान हे पुस्तक वाचताना मनोमन पटते. त्यामुळेच श्रोता आणि गायत यात ज्ञानाचा अनुबंध साधणारा हा ग्रंथ संगीत शिकणाऱ्यांनी आपल्या घरी आवर्जून ठेवायला हवा असा आहे.
– प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
raghunathshetkar0@gmail.com
भारतीय अभिजात संगीत आणि संस्कृती
लेखक : संगीतरत्न पंडित कुमार सुरूशे
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, वसई
पृष्ठ : ३५६, मूल्य : रुपये ६००/-