skill is the dominant step after knowledge nrvb
कौशल्य ही ज्ञानानंतरची हुकूमी पायरी आहे. कारण ज्ञान कितीही अमाप असलं तरी त्याला जोपर्यंत कृतिशील कौशल्याची जोड मिळत नाही तोपर्यंत ते निरर्थक असते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जेव्हा एखादा माणूस नवीनच नोकरीवर रुजू होतो, तेव्हा कंपनी त्याला ट्रेनिंग अर्थात कंपनीच्या कामाबाबतचं प्रशिक्षण देते. यामध्ये प्रथम या व्यक्तीला कंपनीबाबतची संपूर्ण माहिती दिली जाते. म्हणजेच पहिली स्टेप ही की, त्याला काहीच माहिती नसते. तेव्हा त्याला ज्ञान दिले जाते. त्यानंतर दुसरी स्टेप ही की, त्याला माहिती मिळते. त्याप्रमाणे तो कामाला सुरुवात करतो. हळूहळू तो त्या कामाबद्दल एक उत्कृष्ट कौशल्य प्राप्त करतो. असे की, त्याच्यासारखं उत्कृष्ट काम दुसरं कोणीच करणार नाही.
आपण पाहतो, काही माणसांकडे एखादं काम उत्कृष्ट करण्याची खासियत असते. त्यामुळे अशा व्यक्तींना इतरांपेक्षा जास्त मागणी आणि मानसन्मान असतो. ही गोष्ट लक्षात घेता कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी जरी आपलं पहिलं इम्प्रेशन कितीही उत्कृष्ट असलं तरीही सहसा कुठल्याही व्यक्तीला लगेचच परमनंट केलं जात नाही. त्यासाठी कमीतकमी सहा महीने लागतात. त्या दिवसांमध्ये कंपनी त्या व्यक्तिच्या काम करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करते. तसेच तेवढ्या कालावधीत त्या व्यक्तीने कीती ज्ञान मिळवलयं व कोणती कौशल्य विकसित केली आहेत, या गोष्टींचा अभ्यास करते. त्यावरूनचं प्रमोशन देण्याचा बेत कंपनी आखते.
आपण आपल्या आसपास सहज जरी निरीक्षण केले तरी ही गोष्ट लक्षात येईल की, आपणही आपल्या व्यावहारिक आयुष्यात आपल्याला आवडेल त्याच टेलरकडून कपडे शिवतो, केस कंपतो किंवा दुकानातून वस्तु विकत घेतो. किंवा जिथे स्वादिष्ट भोजन मिळेल त्याच हॉटेलमध्ये जाऊन खातो. अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्या घरी केर काढायला आलेली बाई जर ती मनापासून व आपले घर समजून काम करत असेल तर त्या कामात ही स्वच्छता दिसून येते. पण वरवर काम करणाऱ्याच्या कामात अनेक चुका दिसून येतात. कौशल्य असणारी व्यक्ति आपसूकच सर्वांपासून वेगळी असल्याचे जाणवते. आपणही बाकीच्यांपेक्षा काही खास अनुभवलेले असते म्हणून त्यांची निवड करतो.
एखादे कौशल्य आपल्या अंगी आणण्यासाठी त्या कार्याप्रति आवड व समर्पित भाव असणे आवश्यक आहे. जसे चित्रकार, कवी, खेळाडू, नृत्यकार… किंवा कोणतेही क्षेत्र असो व्यक्तीला जर काही बनण्याची प्रबळ इच्छा असेल तर तो त्या क्षेत्रात निपुण होण्यासाठी दिवस रात्र एक करतो. वेळ, तहान भूक सर्व काही विसरून तो ते कार्य करू लागतो. आज जगामध्ये अनेक आर्टिस्ट होऊन गेले पण आपण सर्वांनाच ओळखत नाहीत. ज्यांनी स्वतःवर खूप मेहनत केली आणि ते कौशल्य आत्मसात केले त्यांना सर्व जग ओळखते. नक्कीच त्यांच्या कौशल्याची दाद लोकांनी दिली आहे. बाकींच्या तुलनेत ते त्या कलेत, क्षेत्रात पुढे आहेत याची जाणीव होते.
कोणतेही कौशल्य आपल्यात आणण्यासाठी एकाग्रता असणे हे सर्वात महत्वाचे असते. रोज त्या कलेत स्वतःचा विकास केला जातो. जे काही अडथळे त्या कार्यात येतात त्यांना दूर करण्याची चिकाटीसुद्धा असावी लागते. नाहीतर छोटे छोटे अडथळे आपली दिशा बदलू शकतात. आपण अशीही कितीतरी उदाहरणे बघितली असतील ज्यात व्यक्तीने वेळेच्या अभावी, आत्मविश्वासची कमी असल्यामुळे आपली आवड बदलली.
आयुष्यात काही बनायची, करायची इच्छा असतानाही पैसे कमावण्यासाठी दुसरेच क्षेत्र निवडावे लागले. फार कमी लोक आहेत ज्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. आवड आणि निवड या दोन्ही सर्वांनाच मिळत नाहीत. म्हणून आपले ध्येय जर निश्चित केलेले असेल तर ते मिळवण्याची जिद्द ही असावी लागते. साधना करावी लागते. तेव्हाच आपण ते कौशल्य आपल्यात आणू शकतो.
कौशल्यासंबंधी लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलाला उद्देशून एक बोधक वाक्य म्हटलं होतं की, ‘तू पुण्यातला मोची झालास तरी चालेल, पण पुण्यातल्या सर्व चपला फक्त तुझ्याकडेच बनवायला आल्या पाहिजेत.’ या साध्या वाक्यातून टिळकांनी कौशल्याविषयी किती महत्त्वाची गोष्ट मुलाला पटवून दिली होती. याचाच अर्थ आपल्या कामात एक ‘युनिक अॅबिलिटी’ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपलं काम उत्कृष्ट बनतं.
नीता बेन
bkneetaa24@gmail.com