26,00,000 कोटींची संपत्ती... हे आहे जगातील सर्वात श्रीमंत कुटूंब; अंबानी-अदानींची एकत्रित संपत्तीही नाही तितकी!
अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान उद्यापासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट असणार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. क्राउन प्रिन्स ज्या कुटुंबातून आले आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाकडे 8 खासगी विमाने आहेत.
305 अब्ज डॉलर (सुमारे 26 लाख कोटी रुपये) संपत्ती
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2023 मध्ये या कुटुंबाची एकूण संपत्ती 305 अब्ज डॉलर (सुमारे 26 लाख कोटी रुपये) होती. विशेष म्हणजे ही संपत्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे १११ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे आणि गौतम अदानी यांच्याकडे ९९.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचीही संपत्ती अल नहयान यांच्या कुटुंबाच्या बरोबरीची नाही. एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच्याकडे 237 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
शेख खालिद हे युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा मोठा मुलगा आहे. ते अबू धाबीच्या सत्ताधारी अल नाह्यान कुटुंबाचे सदस्य आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्च 2023 मध्ये, त्यांची अबू धाबीचा क्राउन प्रिन्स आणि अबू धाबी कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संबोधले जाते ‘लंडनचा जमीनदार’
अल नाहयानच्या मालमत्तेत राष्ट्रपती राजवाड्याचाही समावेश आहे. अबुधाबीमध्ये 3.80 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या पॅलेसची किंमत 475 मिलियन डॉलर (सुमारे 4 हजार कोटी रुपये) आहे. याशिवाय अल नहयान कुटुंबाकडे जगभरात अनेक महाल आहेत. यामध्ये पॅरिसमधील शॅटो डी ब्यूलॉन यांचाही समावेश आहे. याशिवाय त्यांच्या यूकेमध्येही अनेक मालमत्ता आहेत. याच कारणामुळे शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांना ‘लंडनचा जमीनदार’ असेही संबोधले जाते.
विमान, बोटींचा मोठा ताफा
अल नाहयान यांच्या कुटुंबाकडे अझझम आणि ब्लू सुपरयाट सारख्या मोठ्या नौका आहेत. त्यांची किंमत 600 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5 हजार कोटी रुपये) आहे. अझझमची लांबी ५९१ फूट आहे. ही जगातील सर्वात लांब नौका मानली जाते. ते जेफ बेझोसच्या सुपरयाट ‘काओरू’ पेक्षा मोठे आहे. याशिवाय क्राउन प्रिन्स यांच्या अल नाह्यान कुटुंबाकडे विमानांचा मोठा ताफा आहे. यामध्ये 8 खासगी जेट विमाने, एअरबस A320-200 आणि तीन बोइंग 787-9 यांचा समावेश आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे 478 दशलक्ष डॉलर (सुमारे 4 हजार कोटी रुपये) किमतीचे बोईंग 747 विमान आणि 176 दशलक्ष डॉलर (सुमारे 1500 कोटी रुपये) किमतीचे बोईंग 787 विमान देखील आहे.
700 हून अधिक गाड्यांचा ताफा
या कुटुंबाकडे 700 हून अधिक गाड्या आहेत. यामध्ये जगातील सर्वात मोठ्या एसयूव्ही आणि जीपचा समावेश आहे. अध्यक्षांचे भाऊ शेख मन्सूर बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांच्याकडे पाच बुगाटी वेरॉन, फेरारी 599XX, मॅक्लारेन MC12, एक मर्सिडीज-बेंझ CLK GTR आणि एक लॅम्बोर्गिनी रेव्हेंटन सारख्या लक्झरी कार देखील आहेत.