Big blow to SBI account holders lending rate hikes by 10 basis points
अनेकजण घर, कार आणि आपल्या विविध कामांसाठी बँकांकडून कर्ज घेत असतात. देशातील विविध बँका आपापल्या पॉलिसीनुसार खातेधारकांना विशिष्ट व्याजदरात कर्ज पुरवठा करत असतात. मात्र, आता जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडीया (एसबीआय) या देशातील सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी निराशानजक बातमी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडीयाने (एसबीआय) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक इंडियाच्या (आरबीआय) आर्थिक धोरणाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एमसीएलआरमध्ये १० बेसिस प्वॉइंटची वाढ
विशेष रिझर्व्ह बँक इंडियाने गेल्या काही काळात आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, असे असतानाही आता एसबीआयच्या खातेधारकांना कर्जावरील वाढीव व्याजाचा बोजा सहन करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडीयाने (एसबीआय) आपल्या एमसीएलआरमध्ये १० बेसिस प्वॉइंट अर्थात 0.1 टक्क्यांची वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या खातेदारांना या वाढलेल्या एमसीएलआरचा बोजा सहन करावा लागणार आहे. अर्थात या निर्याणामुळे कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. परिणामी ग्राहकांना या आधीपेक्षा अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.
कधीपासून लागू होणार नवीन दर?
स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, नवीन एमसीएलआर दर अर्थात नवीन व्याजदर हे १५ जूनपासून लागू होणार आहेत. बँकेच्या व्याजदरातील या बदलामुळे एसबीआयचा एक वर्षाचा एमसीएलआर हा पहिल्या ८.६५ टक्क्यांवरुन वाढून ८.७५ टक्के झाला आहे. ओव्हरनाईट एमसीएलआर आता ८ टक्क्यांवरुन ८.१० टक्के झाला आहे. तर एक महिना ते तीन महिन्यांच्या एमसीएलआर हा ८.२० टक्क्यांवरुन वाढून ८.३० टक्के झाला आहे. याशिवाय सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.५५ टक्क्यांवरुन वाढून ८.६५ टक्के झाला आहे. दोन वर्षांसाठीचा एमसीएलआर ८.७५ टक्क्यांवरुन वाढू ८.८५ टक्के झाला आहे. आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ८.८५ टक्क्यांवरुन ८.९५ टक्के झाला आहे.
गृहकर्ज आणि वाहन कर्जासह अनेक किरकोळ कर्जांवरील एमसीएलआर वाढला आहे. रेपो रेट किंवा ड्रेझरी बिल यांच्याशी निगडीत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर एमसीएलआर वाढीचा काहीही परिणाम होणार नाही. दरम्यान, एसबीआय बँकेकडून सांगण्यात आले की, बँकेकडून व्यवसाय वाढीसाठी निधी देण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 830 कोटी रुपये) किमतीचे रोखे जारी करण्यात आले आहेत.