अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने 'या' कंपनीवर केली मोठी कारवाई!
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यांच्या कंपन्यांवर अनेकदा वाद आणि नियामक कारवाईचे ढग दाटून येतात. आता त्यांची कंपनी रिलायन्स बिग एंटरटेनमेंटला (आरबीईपी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) भारतीय बाजार नियामक सेबीकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
सेबीने बँक, डिमॅट खाती संलग्न केली
रिलायन्स बिग एंटरटेनमेंटवर कडक कारवाई करत सेबीने कंपनीचे बँक खाते, डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्ज संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीकडून 26 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या रकमेत व्याज आणि वसुली खर्चाचाही समावेश होतो. सेबीने संबंधित बँका, डिपॉझिटरीज आणि म्युच्युअल फंडांना या खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
शेअर बाजारातील उत्साह परतला; गुंतवणूकदारांनी दिवसभरात कमावले 3 लाख कोटी रुपये
पैसे वळवण्याचे प्रकरण
14 नोव्हेंबर रोजी सेबीने रिलायन्स बिग एंटरटेनमेंटला नोटीस बजावली होती. ज्यामध्ये कंपनीवर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचा निधी बेकायदेशीरपणे वळवल्याचा आरोप होता. नोटीसमध्ये कंपनीला 15 दिवसांत 26 कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, कंपनीने या आदेशाचे पालन केले नाही. यानंतर, सेबीने संलग्नक आदेश जारी केला आणि थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली आहे.
कंपनीच्या खात्यांचे निरीक्षण वाढले
सेबीने संबंधित संस्थांना संलग्न खात्यांमधून पैसे काढले जाणार नाहीत. किंवा त्यामध्ये कोणताही व्यवहार केला जाणार नाही. याची खात्री करण्यास सांगितले आहे. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सेबीने स्पष्ट केले. अनिल अंबानींच्या कंपनीला सेबीच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या अनेक कंपन्यांवर नियामक नियमांचे उल्लंघन आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)