महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्वस्त दरात गहू विक्री करणार!
मागील काही दिवसांपासून गहू दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. अशातच आता केंद्र सरकारने गहू दर नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने गहू दरवाढीमुळे महागाई वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना स्वस्त दरात गहू पीठ आणि बिस्कीट उपलब्ध व्हावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
23,250 रुपये प्रति क्विंटल दराने होणार विक्री
केंद्र सरकारने आपल्या राखीव साठ्यातून पीठ निर्मिती उद्योगातील कंपन्या आणि बिस्कीट उत्पादक कंपन्यांना स्वस्त दरात गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या माध्यमातून ही ओएमएसएस स्कीमअंतर्गत ही गहू विक्री केली जाणार आहे. साधारणपणे केंद्र सरकार आपल्याकडील राखीव साठ्यातील गहू या कंपन्यांना 23,250 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री करणार आहे. विशेष म्हणजे गव्हाचा हा दर बाजारातील गहू दराच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी असणार आहे.
१० दशलक्ष टन गहू विक्री
दरम्यान, केंद्र सरकारकडून ओएमएसएस (OMSS) अंतर्गत नेमका किती गहू विक्री केला जाणार आहे. याबाबत अधिक माहिती सरकारकडून जारी करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारने खुल्या बाजारात एकूण १० दशलक्ष टन गहू विक्री केला होता. जी आतापर्यंतची सरकारी कोट्यातून विक्रमी गहू विक्री ठरली आहे.
रॉयटर्स या आघाडीच्या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई स्थित ग्लोबल ट्रेडिंग हाऊससोबत जोडले गेलेल्या एका डीलरने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून स्वस्त दरात गहू उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्यामुळे सरकारच्या या योजनेमध्ये पुढील महिन्यात अनेक पीठ निर्मिती कंपन्या आणि बिस्कीट निर्मिती कंपनी सहभागी होऊ शकतात.
वर्षभरात गहू दर ६ टक्क्यांनी वाढले
दरम्यान, भारतात मागील वर्षभरापासून गहू दरात तब्बल ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 2022 आणि 2023 मध्ये तापमान वाढीमुळे गहू उत्पादनाला मोठा फटका बसला. ज्यामुळे मे 2022 पासून केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत गहू निर्यातबंदी कायम आहे.