फोटो सौजन्य - Social Media
डेलॉइट टौश तोहमात्सु इंडिया एलएलपी म्हणजेच डेलॉइट इंडियाने एंटरप्राइझ ग्रोथ अवॉर्ड्स २०२५ साठी परीक्षक मंडळाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील उत्कृष्ट कौटुंबिक उद्योग, अब्जाधीश आणि लवकरच अब्जाधीश होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपन्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते. तसेच नेतृत्व, दूरदृष्टी आणि प्रगती दर्शविणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर एक ओळख मिळवून देण्याचा उद्देश या पुरस्काराचा आहे. एंटरप्राइझ ग्रोथ अवॉर्ड्स २०२५ साठीच्या परीक्षक मंडळामध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षकांमध्ये इन्फोसिसचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष एस. डी. शिबुलाल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. वृंदा जाघीरदार, कॅटामरन व्हेंचर्सचे अध्यक्ष एम. डी. रंगनाथ, तसेच डेलॉइटचे वरिष्ठ सल्लागार मनोज कोहली यांचा समावेश आहे.
ही प्रतिष्ठित मंडळी उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक उत्कृष्टतेचा सखोल अभ्यास करून, सर्वोत्कृष्ट कंपन्यांची निवड करण्यासाठी एक पारदर्शक आणि कठोर मूल्यमापन प्रक्रिया सुनिश्चित करतील. डेलॉइट इंडियाने ह्या पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील असामान्य उद्योगांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. लहान स्तरावर सुरू झालेल्या कंपन्यांनी, कठीण आव्हाने पार करून, जागतिक स्तरावर कशी भरारी घेतली आहे, हे दाखवण्याची संधी हा पुरस्कार देतो.
या पुरस्कारांतर्गत कंपन्यांची निवड करताना रूपांतर, नेतृत्व आणि नवोपक्रम (Innovation) या तत्त्वांवर भर दिला जातो. परीक्षक मंडळ हे सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवून मूल्यांकन करेल, जेणेकरून उद्योग क्षेत्रातील उत्तम आणि टिकाऊ कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना योग्य मान्यता मिळेल. डेलॉइट इंडियाचे भागीदार आणि नेतृत्वकर्ते के. आर. शेखर म्हणाले, “हे परीक्षक मंडळ पुरस्काराच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. त्यामुळे हा भारतातील खाजगी क्षेत्रातील उत्कृष्टतेचा खरा महोत्सव ठरेल.”
तसेच, डेलॉइट इंडियाचे भागीदार धीरज भंडारी म्हणाले, “या पुरस्काराला मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. उद्योग क्षेत्रात आपल्या नावीन्यपूर्ण कार्यामुळे प्रभाव निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी हा पुरस्कार सन्मानाचा क्षण आहे.” एंटरप्राइझ ग्रोथ अवॉर्ड्स २०२५ साठी भारतभरातील २०० हून अधिक कंपन्यांनी अर्ज केला आहे. या पुरस्कारामुळे उद्योग क्षेत्रातील विविध स्तरांवरील अद्वितीय प्रवास जगासमोर येतील. हा पुरस्कार व्यावसायिक उत्कृष्टतेचा गौरव करणारा एक महत्त्वाचा मंच ठरत असून, त्यामुळे भारतीय उद्योग जगतातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल.