भारतातील परकीय चलन साठ्यात मोठी घट; वाचा... काय आहे नेमकं घटीमागील कारण!
भारतीय परकीय चलन साठ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 26 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा तब्बल 3.471 अब्ज डॉलर्सने घसरुन 667.386 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. १९ जुलैच्या आठवड्यात, देशाचा एकूण चलन साठा 4.003 अब्ज डॉलरने वाढून, 670.386 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहचला होता.
अर्थसंकल्पानंतर विदेशी गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा
अर्थात भारताच्या परकीय चलन साठ्यात मागील आठवड्यात तब्बल 3.471 अब्ज डॉलर्सने घसरण नोंदवली गेली होती. असे असतानाच शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात मात्र वाढ नोंदवली गेली आहे. २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकलप सादर झाल्यानंतर, शेअर बाजार घसरणीला लागला. ज्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत, भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. परिणामी, २६ जुलैच्या आठ्वड्यात देशातील परकीय चलन साठ्यात तब्बल 3.471 अब्ज डॉलर्सने घसरण नोंदवली गेली.
हेही वाचा : मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? …मोजता-मोजता थकून जाल!
पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात वाढ
भारतातील परकीय चलन साठा घटत असताना, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात मात्र परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. २६ जुलैच्या आठवड्यात पाकिस्तानात परकीय चलन साठ्यात 56.3 दशलक्ष डॉलरने वाढ झाली आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा आता, 14.391 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. १९ जुलै रोजी तो 14.335 अब्ज डॉलरपर्यंत खाली घसरला होता.
सोन्याच्या साठ्यात 2.3 अब्ज डॉलरची घट
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 2.297 अब्ज डॉलरने घटून 57.695 अब्ज डॉलरपर्यंत खाली आले आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 5 मिलियन डॉलर्सने कमी होऊन 18.202 अब्ज डॉलरवर आला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मधील भारताच्या राखीव ठेवी 2 मिलियन डॉलरने वाढून, 4.612 अब्ज डॉलर झाल्या आहेत.