फोटो सौजन्य - Social Media
आंध्र प्रदेशमधील एका तरुण दांपत्याने ‘सुखी नोकरी म्हणजेच यश’ या संकल्पनेला छेद देत, काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. आयटी क्षेत्रात यशस्वी कारकीर्द असतानाही त्यांनी ती सोडून जैविक शेती आणि ऑर्गेनिक उत्पादन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा उद्देश फक्त पैसा कमावणे नव्हता, तर लोकांना आरोग्यदायी अन्न देणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हा होता.
के. मणिकंता आणि नागा वेंकट दुर्गा पावनी या दोघांनीही बी.टेक पूर्ण करून अनुक्रमे इंफोसिस आणि अॅक्सेंचर या नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र, काहीतरी अपूर्ण असल्याची भावना त्यांच्या मनात सतत राहत होती. मणिकंता म्हणाले की, “आयटी क्षेत्रात चांगली पगार असूनही अनेक कर्मचारी आजारी असतात.” पावनीनेही म्हटले की, “लाइफस्टाइल चुकीची असल्याने अनेक आजार होतात. त्यामुळे आम्ही ठरवलं की, लोकांच्या आरोग्यासाठी काहीतरी वेगळं करायचं.”
या विचारातूनच त्यांनी ‘श्रेष्ठ’ या नावाने एक ऑर्गेनिक स्टोअर सुरू केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे शेतीचा काही अनुभव नव्हता. पण त्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीची (SPNF) प्रशिक्षण घेतलं. मणिकंता आठवड्याच्या शेवटी चेन्नईहून आपल्या मूळगावी जाऊन प्रशिक्षण घेत असत. अनेक महिन्यांच्या तयारीनंतर 2017 मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेती आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आपली संपूर्ण बचत १७ लाख रुपये त्यांनी ‘श्रेष्ठ’मध्ये गुंतवले. सुरुवातीला दुकान नसतानाही मणिकंता स्वतः शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोचवत असत. त्यांनी आंबा, बाजरी पीठ, तूर डाळ, हेल्थ मिक्स अशा काही ऑर्गेनिक उत्पादनांची विक्री सुरू केली.
‘श्रेष्ठ’चा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांना चांगल्या दराने उत्पादन विक्रीचा पर्याय देणे. कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी महालक्ष्मण यांनी सांगितले की, याआधी त्यांना त्यांच्या ऑर्गेनिक आंब्यांना योग्य भाव मिळत नव्हता. आता ते एका हंगामात ४ लाख रुपये कमवत आहेत, जे पूर्वी फक्त २ लाख होते. पाच वर्षांत ‘श्रेष्ठ’ने दरमहा सुमारे ७.५ लाख रुपये कमाई आणि ९० लाखांचा टर्नओव्हर गाठला आहे. मात्र मणिकंता आणि पावनीसाठी खरी यशस्वीता म्हणजे लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवणे. त्यांना आनंद आहे की ते लोकांना हेल्दी लाईफस्टाईलकडे वळण्यास मदत करत आहेत.