Edible Oil
सणासुदीचा काळ जवळ आला असून, सर्वसामान्यांना येत्या काळात खाद्यतेलासाठी अधिकची किंमत मोजावी लागणार आहे. देशांतर्गत भारतीय रिफायनरीज पामतेल करार रद्द करत आहेत. या पाम तेलाची डिलिव्हरी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होणार होती. भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार देश आहे. भारत दर महिन्याला सुमारे 7.50 लाख टन पामतेल आयात करतो. यापैकी आतापर्यंत सुमारे 1 लाख टन पामतेलाचे करार रद्द करण्यात आले असून, ते एकूण आयातीच्या 13 टक्के आहे.
4 दिवसांत 1 लाख टन पामतेलाचे करार रद्द
केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. पाम तेल हे खाद्यतेलामध्ये मिसळले जाते. अशा स्थितीत त्याच्या कमतरतेमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या 4 दिवसांत हे 1 लाख टन पामतेलाचे करार रद्द करण्यात आले आहेत. तर सोमवारी (ता.२३) सुमारे 50 हजार टन किमतीच्या आयात ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. मलेशियातील पामतेल भविष्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे हे घडत आहे, असे सांगितले जात आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – ‘हे’ आहे श्रीमंतांचे गाव… चहा पावडर, दूध आणायलाही लोक जातात विमानाने; वाचा… सविस्तर!
आयात शुल्क 5.5 टक्क्यांवरून, 27.5 टक्क्यांपर्यंत वाढले
भारताने ऑर्डर रद्द केल्यामुळे मलेशिया पाम तेलाचे दर खाली येऊ शकतात. याशिवाय सोया तेल उत्पादकांनाही याचा फायदा होऊ शकतो. अनेक रिफायनरीज सोया तेलावर देखील स्विच करू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला भारताने कच्च्या आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे पामतेलावरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ऑर्डर रद्द करण्यात रिफायनरीला अधिक फायदा होतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पामतेल विक्रेतेही खूश असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
पाम तेलाचा दर 1080 डॉलर प्रति टन
दरम्यान, सध्या कच्च्या पाम तेलाचा दर सध्या 1080 डॉलर प्रति टन इतका आहे. महिनाभरापूर्वी जो 980 ते 1000 डॉलर इतका होता. मलेशियाशिवाय भारत हा प्रामुख्याने इंडोनेशिया आणि थायलंडमधून पामतेल आयात करतो. आशियामध्ये पाम तेल स्वस्त असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण आता ते सोया तेलाच्याच भावात आले आहे. अशा परिस्थितीत कंपन्या हिवाळ्यात सोया तेल आणि सूर्यफूल तेल खरेदी करू शकतात. भारत अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयात करतो.