फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात अनेकजण नोकरीसाठी वणवण भटकत असतात. मात्र, अपेक्षित नोकरी मिळत नसल्याने निराश होतात. त्याचवेळी काही जण असेही असतात जे नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी होण्याचा मार्ग निवडतात. बिहारमधील अररिया जिल्ह्यातील काला बलुआ येथे राहणारा शिवम कुमार त्यापैकीच एक प्रेरणादायी उदाहरण आहे. फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर अंड्यांच्या व्यवसायातून दरमहा ४० ते ५० हजार रुपयांची कमाई करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिवम कुमारने काही वर्षांपूर्वी काला बलुआ येथील पूर्णिया जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर “एग सेंटर” नावाने आपली अंड्यांची दुकान सुरू केली. सुरुवातीला हा व्यवसाय लहान स्वरूपाचा होता, मात्र वेळोवेळी नव्या कल्पना आणि मेहनतीच्या जोरावर त्याने व्यवसायाचा विस्तार केला. त्याच्या दुकानात सध्या दररोज २,००० पेक्षा जास्त अंडी विकली जातात. येथे १० रुपयांपासून ३० रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या अंड्यांचे पदार्थ उपलब्ध आहेत.
शिवमच्या दुकानात अंडी खाण्यासाठी रानीगंज, भरगामा, बडहरा, कचहरी बलुआ आणि चंपानगरसारख्या आसपासच्या गावांतील तसेच शहरातील ग्राहक मोठ्या संख्येने येतात. शिवमने सांगितले की, “नोकरीच्या मागे लागण्याऐवजी मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.” विशेषतः हिवाळ्यात व्यवसायाला चांगली मागणी असते. थंडीत लोकांना गरम पदार्थांची आवड असल्याने अंडी विक्रीत मोठी वाढ होते, ज्यामुळे महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतची कमाई होते. या व्यवसायातून केवळ आर्थिक यशच नाही तर शिवमला सामाजिक प्रतिष्ठाही मिळाली आहे. त्याच्या चिकाटीमुळे आज तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. यशाच्या गोडीने इतरही युवकांना व्यवसायाच्या संधींचा विचार करण्याची स्फूर्ती दिली आहे.
शिवमच्या यशाचा हा प्रवास दाखवतो की शिक्षण कमी असलं तरी जिद्द, मेहनत आणि योग्य दृष्टिकोन असला तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येऊ शकतं. त्याच्या या व्यवसाय योजनेने आणि मेहनतीने सिद्ध केलं आहे की, काम कोणतंही असो, ते इमानदारीने केल्यास यश नक्कीच मिळतं. तरुणांनी नोकरीच्या पलीकडे विचार करून उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे हे शिवमच्या यशस्वी प्रवासातून स्पष्ट होतं.