12 हजारावर करायचे नोकरी, आज मासेपालनातून करतायेत 2 कोटींचा टर्नओव्हर!
सध्या शेतीमध्ये योग्य ते मिळत नसल्याने, अनेक शेतकरी शेतीआधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या व्यवसायांमधून अधिकचे उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे सध्या मासेपालन व्यवसायातून वार्षिक कोटींचे उत्पन्न मिळवत आहेत. विशेष म्हणजे पाच एकरात सुरु केलेला मासेपालन व्यवसाय सध्या त्यांनी ४२ एकरांपर्यंत वाढवला आहे. ज्यामुळे एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
तुटपुंज्या पगारावर कुटुंब चालवताना कसरत
संकरशन शाही असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शेतकरी संकरशन शाही हे सुरुवातीला काही काळ एका कंपनीमध्ये १२ हजार रुपये पगारावर काम करत होते. इतक्या तुटपुंज्या पगारावर कुटुंब चालवताना त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. अशातच त्यांचे नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी शेतीची वाट धरली. मात्र, शेतीमध्ये पाऊल ठेवताना त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता, शेतीआधारित उद्योगामध्ये आपले काही करता येईल का? या दिशेने चाचपणी सुरु केली. त्यानुसार त्यांनी मासेपालन व्यवसायाबाबत माहिती मिळवत, पूर्ण क्षमतेने मासेपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
2014 मध्ये सर्वप्रथम त्यांनी पाच एकरात आपला मासेपालन व्यवसाय सुरु केला. मात्र, गेल्या काही वर्षात त्यांनी या व्यवसायातील नफ्याच्या जोरावर प्रगती करत, आज ४२ एकरात मासेपालन व्यवसाय करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी मागील वर्षी 5 सप्टेंबर 2023 रोजी मासेपालन व्यवसायाशी संबंधित ‘पूर्वांचल पोट्ररी’ या नावाने एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. त्यांच्या या एफपीओसोबत जवळपास 385 शेतकरी जोडले गेले आहेत. ज्यातील ८० शेतकरी हे पूर्ण क्षमतेने मासेपालन व्यवसाय करत आहेत.
वार्षिक 2 कोटींचा टर्नओव्हर
शेतकरी संकरशन शाही सांगतात, आपल्या ‘पूर्वांचल पोट्ररी’ या शेतकरी उत्पादक कंपनीला वार्षिक ४० लाख रुपयांचा निव्वळ नफा होत आहे. इतकेच नाही तर आपल्या एफपीओचा वार्षिक टर्नओव्हर हा जवळपास २ कोटी असल्याचे ते सांगतात. याशिवाय त्यांनी आपल्या शेतीमध्ये तलावांच्या किनारी पपईची झाडे देखील लावली आहेत. ज्यातून देखील त्यांना वार्षिक ३ ते ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोणत्या जातींचे करतायेत पालन?
शेतकरी संकरशन शाही सांगतात, आपण आपल्या शेतीमध्ये रोहू, नयीन, कटला, पंगेसियस, ग्रास कार्प, सिल्व्हर कॉर्प आणि कॉमन कार्प यासह आपण विविध प्रजातीच्या माशांचे पारंपारिक पद्धतीने पालन करतो. विशेष म्हणजे आपल्या माशांना देवरियासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये खूप मागणी असते. विवाह काळात ही मागणी सामान्यच्या तुलनेत दुप्पट होते. ज्यामुळे आपल्याला मासेपालन व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे ते सांगतात.