घरे खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; एनबीसीसी सुपरटेकचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार!
अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या सुपरटेक कंपनीचे रखडलेले प्रकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवलेल्या हजारो ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण, सरकारी कंपनी नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) सुपरटेक लिमिटेडने तीन वर्षांत सुपरटेकच्या १७ प्रकल्पांमध्ये ५०,००० सदनिका बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे आता आम्रपालीनंतर सुपरटेकच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
अडकलेत हजारो लोकांचे पैसे
देशातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी सुपरटेक लिमिटेड ही सध्या दिवाळखोरीत आहे. कंपनीच्या प्रवर्तकावर मनी लाँड्रिंग आणि निधी वळवण्यासारखे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे कंपनीच्या प्रकल्पांचे बांधकाम ठप्प होऊन हजारो लोकांचे पैसे अडकले आहेत. यानंतर, एनबीसीसीने प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) परवानगी मागितली होती.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – बांगलादेशला अंधारात ठेवणार अदानी समुह; वीज बील न भरल्याने दिला इशारा!
फ्लॅट्सचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनबीसीसी हे रखडलेले प्रकल्प 9,500 कोटी रुपये खर्चून पूर्ण करणार आहे. त्या बदल्यात 16,000 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. यापैकी 14,000 कोटी रुपयांची विक्री न झालेली इन्व्हेंटरी असणार आहे. एनबीसीसीच्या या प्रस्तावानंतर सुपरटेकच्या खरेदीदारांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. या सर्व फ्लॅट्सचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. अशा परिस्थितीत, नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील सुपरटेक लिमिटेडच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आहेत. त्यांच्यासाठी ही एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे.
हे देखील वाचा – अंबानी-अदानी-टाटा नाही… तर ‘या’ मुंबईकराने घेतला देशातील सर्वात महागडा फ्लॅट!
योजनेसाठी 12 ते 36 महिन्यांचा कालावधी निश्चित
एनबीसीसीने योजना पूर्ण करण्यासाठी 12 ते 36 महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. ज्यांची सुरुवात दिवस शून्यापासून होईल. शून्य दिवसात जमीन मंजुरीपासून निधीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. प्रकल्पातील निधीची उपलब्धता अत्यावश्यक असल्याचे नमूद करून एनबीसीने या प्रकल्पांचे हिशेब मागितले आहेत. यासोबतच प्रकल्प सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.