सरकारी बॅंका व्यवस्थित काम करतायेत की नाही? अर्थमंञ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्त्वाची बैठक!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थात १९ ऑगस्ट रोजी सर्व सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ही बैठक होणार आहे. या आढावा बैठकीत सरकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध शासकीय योजनांचेही मूल्यमापन या बैठकीत होणार आहे.
सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या या वित्तीय संस्था आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहेत, याची खात्री करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत अर्थमंत्र्यांशिवाय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – खासगी नोकरदार दोन वेळच्या जेवणासाठी झगडतायेत; वर्क इंडियाचा धक्कादायक अहवाल समोर!
या बाबींवर होणार बैठकीत चर्चा
या बैठकीत सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSB) बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या (RRB) आर्थिक स्थितीसह, त्यांच्या ठेवींमधील वाढ, क्रेडिट-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेची गुणवत्ता यासह बँकांच्या आर्थिक स्थितीच्या अनेक प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याशिवाय डिजिटल पेमेंटसाठी विकास भारत कार्ड देण्याबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते. याशिवाय, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडने ताब्यात घेतलेल्या खात्यांच्या सध्यस्थितीवरही चर्चा होणार आहे.
सरकारी योजनांवरही चर्चा होणार
अर्थमंञ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत अनेक सरकारी योजनांवरही चर्चा होणार आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सूर्य घर, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना इ. याशिवाय डिजिटल व्यवहार आणि बँकिंग कामकाजाबाबत सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. याशिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई), सरकारी योजनांतील कामगिरी, प्रलंबित समस्या इत्यादींचाही या बैठकीत समावेश केला जाणार आहे.
अर्थसंकल्पानंतर पहिलीच बैठक
गेल्या महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर अशा प्रकारची ही पहिलीच आढावा बैठक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर करण्यात आला होता. त्यानंतर एकही आढावा बैठक झालेली नाही. अशा परिस्थितीत उद्या म्हणजेच सोमवारी (ता.१९) होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.