तुम्हीही निकृष्ट दर्जाचा मसाला खाताय का? देशातील मसाल्यांचे 12 टक्के नमुने एफएसएसएआयच्या चाचणीत फेल
भारतीय मसाला कंपन्या गेल्या काही काळापासून जगभर संकटाचा सामना करत आहे. एकापाठोपाठ एक सर्वच मसाला कंपन्यांच्या उत्पादनांची कठोर चाचणी करावी लागत आहे. या प्रकरणाची सुरुवात हाँगकाँगपासून झाली. जगातील अनेक देशांमध्ये भारतीय मसाला कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे. अशातच आता एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतीय मसाल्यांचे सुमारे 12 टक्के नमुने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) चाचणीत अपयशी ठरले आहेत. या कंपन्यांनी गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता केलेली नाही.
एफएसएसएआयकडून चौकशी सुरू
भारतीय मसाला उद्योगासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता न करणे ही मोठी समस्या बनत आहे. ब्रिटननंतर आता न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतातील मोठ्या मसाल्यांच्या ब्रँडचीही कडक तपासणी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये भारतीय मसाल्यांच्या आयातीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हाँगकाँगमध्ये दोन आघाडीच्या भारतीय मसाल्यांच्या ब्रँडवर बंदी घातल्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देखील भारतीय मसाल्यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – रक्षाबंधन हा फक्त सण नाही, …तर देशभरात होते तब्बल 12000 कोटींची उलाढाल! वाचा सविस्तर…
474 नमुने गुणवत्ता, सुरक्षितता निकषांमध्ये फेल
विशेष म्हणजे एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन्ही कंपन्यांनी त्यांचे मसाले पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताशिवाय या दोन्ही कंपन्यांचे मसाले युरोप, अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. भारताच्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत रॉयटर्सने मिळवलेल्या माहितीनुसार, या अहवालात मे ते जुलै दरम्यान 4,054 नमुने तपासण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी 474 गुणवत्ता आणि सुरक्षितता निकषांमध्ये उत्तीर्ण झालेले नाहीत. तथापि एफएसएसएआयने चाचणीत अपयशी ठरलेली उत्पादने कोणत्या कंपन्यांची आहेत, हे सांगण्यास नकार दिला आहे. पण, या कंपन्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कंपन्यांची नावे उघड नाही
दरम्यान, रॉयटर्सने एफएसएसएआयकडून गुणवत्ता आणि सुरक्षितता निकषांमध्ये उत्तीर्ण न झालेल्या कंपन्यांची माहिती मागवली होती. परंतु, सरकारी एजन्सीने त्यांच्याकडे अशी माहिती नसल्याचे सांगितले. या सर्वांवर भारतीय कायद्यांच्या आधारे कारवाई केली जाईल. भारताचा मसाला उद्योग 2022 पर्यंत अंदाजे 10.44 अब्ज डॉलरचा होता. याशिवाय, भारतातून सुमारे 4.46 डॉलर किमतीचे मसालेही निर्यात केले जात होते.