एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना फटका; शेअर्स घसरणीमुळे झटक्यात 53,000 कोटींचे नुकसान!
मागील काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत होती. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. मात्र, आज शेअर बाजारात शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये आज 400 अंकांनी घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 100 अंकांनी घसरला आहे. अशातच बँक निफ्टीमध्ये देखील 1.42 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेले एचडीएफसी बँकेचे शेअर्स आज कोसळले आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
गुंतवणूकदारांचे 53,000 कोटींचे नुकसान
आज (ता.५) शेअर बाजार सुरु होताच एचडीएफसी बँकेचे शेअर ४ टक्क्यांनी कोसळले. शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे एचडीएफसी बँकेचा मार्केट कॅप झटक्यात 53,000 कोटींनी खाली घसरला आहे. अर्थात एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचे बाजारमूल्य तब्बल 53000 कोटींनी कमी झाले आहे. सध्याच्या घडीला खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 13.13 लाख कोटी इतके आहे. दरम्यान, आज बाजारात घसरण झाल्यानंतर बँकेचे शेअर 4.16 टक्क्यांनी घसरण होऊन, 1655 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
(फोटो सौजन्य : istock)
का झालीये बँकेच्या शेअरमध्ये घसरण?
एचडीएफसी बँकेची चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीच्या काळातील बँकेचे कर्ज वितरण आणि ठेवींमध्ये वाढ ही कमी राहिली आहे. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दरम्यान, जागतिक वित्तीय सेवा पुरवणाऱ्या नोमुरा इंडिया या कंपनीने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत एचडीएफसी बँकेच्या कर्ज आणि ठेवींमध्ये 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बँकेच्या कर्ज वितरणात घसरण
आर्थिक वर्ष 24-2025 च्या पहिल्या तिमाहीत आकडेवारी सादर झाल्यानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर्स बीएसईवर 4.19 टक्क्यांनी घसरून 1,654.25 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर आले आहे. बँकेच्या पहिल्या तिमाहीत आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत कर्ज वितरणात 0.8 टक्क्यांनी घट, तर वार्षिक कर्ज वितरणात 10.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.