फोटो सौजन्य - Social Media
कपडे असोत वा वस्तू, “मीशो आहे ना!” हे वाक्य आज अनेकांच्या तोंडात आहे. पण या यशस्वी कंपनीमागचा इतिहास थोडक्यात समजून घेणं रंजक ठरेल. 2015 साली IIT दिल्लीचे दोन विद्यार्थी, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी Meesho ची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता की प्रत्येकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करता यावा. त्यावेळी मोठे ई-कॉमर्स ब्रँड भरभराटीत होते, पण लहान विक्रेत्यांसाठी सहज प्लॅटफॉर्म नव्हता. हेच त्यांनी बदलायचं ठरवलं.
Meesho ने पारंपरिक ई-कॉमर्स पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग निवडला, ते म्हणजे सोशल कॉमर्स! इथे विक्रेत्यांना स्टॉक ठेवण्याची गरज नाही. ते फक्त WhatsApp, Facebook, Instagram वर प्रॉडक्ट शेअर करून ऑर्डर मिळवू शकतात. यामुळे विशेषतः गृहिणींना आणि महिलांना व्यवसायाची संधी मिळाली. Meesho या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या यशामागे अनेक कारणं असली, तरी त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे Zero Commission मॉडेल. पारंपरिक ई-कॉमर्स कंपन्या विक्रेत्यांकडून त्यांच्या विक्रीवर ठराविक टक्केवारीने कमिशन घेतात. त्यामुळे उत्पादनांची किंमत वाढते आणि विक्रेत्यांचाही नफा कमी होतो. पण Meesho ने हा सगळा साचा मोडून टाकत, एक पूर्णपणे विक्रेते-केंद्रित मॉडेल तयार केलं.
इथे विक्रेत्यांकडून कोणतेही कमिशन घेतलं जात नाही. म्हणजे, जेवढ्या किमतीला उत्पादन विकलं जातं, त्याचा संपूर्ण नफा विक्रेत्यालाच मिळतो. यामुळे ग्राहकांनाही त्याचा थेट फायदा होतो, कारण वस्तू इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा स्वस्त दरात मिळतात. याच धोरणामुळे Meesho ने अल्पावधीतच कोट्यवधी ग्राहकांचं आणि लाखो विक्रेत्यांचं विश्वासार्ह स्थान मिळवलं. आज Meesho सोबत ११ लाखांहून अधिक विक्रेते जोडले गेले आहेत. त्यातही अनेक महिला, गृहिणी आणि छोट्या गावांतील तरुण-तरुणी आहेत. ही लोकं पारंपरिक दुकानदार नव्हे, तर घरबसल्या मोबाईलवरूनच व्यवसाय करणारे नवउद्योजक आहेत. Meesho च्या माध्यमातून ते WhatsApp, Instagram, Facebook वरून प्रॉडक्ट्स शेअर करतात, ऑर्डर घेतात, आणि कोणतीही गुंतवणूक न करता व्यवसाय चालवतात.
आज Meesho वर ७०० पेक्षा जास्त कॅटेगरीजमध्ये वस्तू विकल्या जातात, जसे की कपडे, अॅक्सेसरीज, किचन आयटम्स, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती सामान, ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि बरंच काही. 2022 मध्ये तर Meesho ने एक प्रचंड विक्रम केला. दरमहा १० कोटी ऑर्डर्स पूर्ण केल्या गेल्या! हा आकडा किती मोठा आहे, याची कल्पना ही पुरे कारण अनेक मोठ्या ई-कॉमर्स ब्रँड्सही हे लक्ष पार करू शकलेले नाहीत.
विदित आत्रे यांनी IIT नंतरची नोकरी सोडून हा धोका पत्करला. सुरुवातीला अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. आज त्यांची संपत्ती $2.3 बिलियन (₹19,000 कोटी) आहे. तर सहसंस्थापक संजीव बर्नवाल यांची संपत्ती $2.1 बिलियन (₹17,400 कोटी) आहे.