

'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड?
अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज आहे अब्जावधींची
बिसलेरीची कमाल कहाणी
Bisleri Success Story : भारतात मिनरल वॉटर किंवा बाटलीबंद पाणी म्हटले की सर्वात आधी 'बिसलेरी' हेच नाव समोर येते. एकेकाळी अवघ्या ४ लाख रुपयांना खरेदी केलेली ही कंपनी रमेश चौहान यांच्या दूरदृष्टीमुळे आज अब्जावधी रुपयांचा ब्रँड बनली आहे. ज्या काळात लोक बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा विचारही करत नव्हते, त्या काळात बिसलेरीने बाजारपेठ कशी काबीज केली?
जेव्हा मिनरल वॉटरचे नाव मनात येते, तेव्हा सर्वात आधी बिस्लेरी हे नाव आठवते. आजही, जेव्हा लोक दुकानात पाण्याची बाटली विकत घ्यायला जातात, तेव्हा ब्रँड कोणताही असो, ते अनेकदा विचारतात, "बिस्लेरीच मिळेल का?" त्यामुळे भारतात मिनरल वॉटर म्हणजे बिसलेरी ही ओळखच बनली आहे. सध्या मात्र या ब्रँडच्या पाण्यावरुन बराच गोंधळ सुरु आहे. ही आजची परिस्थिती असली तरीही भारतात ही लोकप्रियता बिसलेरीने कशी मिळवली काय आहे या मागची स्टोरी? समजून घेऊयात.
नमुना चाचणीत दोनदा अयशस्वी ठरल्याने कंपनीचे नाव सध्या चर्चेत आहे. FSSAI ने अहवाल दिला आहे की, कंपनीच्या गोवा येथील प्लांटमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात ब्रोमेट आणि इतर हानिकारक घटक PAHs परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले आहेत. तसेच, कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
यावर स्पष्टीकरण देताना कंपनीने सांगितले की, त्रयस्थ प्रयोगशाळेच्या चाचणीत नमुना पूर्णपणे सुरक्षित आढळला आहे आणि कंपनी नियमांनुसार नियामकांना पूर्ण सहकार्य करत आहे. आजकाल चर्चेत असलेल्या आणि देशभरात घराघरात पोहोचलेल्या या ब्रँडची सुरुवात कोठे आणि कशी झाली असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला, आम्ही तुम्हाला ही रंजक कहाणी सांगतो.
बिसलेरीची स्थापना १८५१ मध्ये सिग्नर फेलिस बिस्लेरी या इटालियन व्यावसायिक, रसायनशास्त्रज्ञ आणि संशोधकाने केली. त्यांनी सर्वप्रथम औषधी वनस्पती, सिंकोना आणि लोह क्षारांपासून एक टॉनिक तयार केले, जे अल्कोहोलचे दुष्परिणाम आणि मलेरियावर उपचार करण्यासाठी विकले जात होते. फेलिसच्या मृत्यूनंतर, त्यांचे फॅमिली डॉक्टर आणि जवळचे मित्र, डॉ. सेझारे रॉसी, कंपनीचे मालक झाले.
कंपनीचे मालक झाल्यानंतर, डॉ. सेझारे रॉसी यांनी इटलीमध्ये बिस्लेरीला बाटलीबंद मिनरल वॉटर ब्रँड म्हणून विकसित केले. त्यानंतर ते भारतात आले, जिथे त्यांची भेट भारतीय वकील खुशरू सुंतूक यांच्याशी झाली. भारतात, त्यांनी मुंबईतील ठाणे येथे बिस्लेरीचा पहिला बॉटलिंग प्लांट स्थापन केला. सुरुवातीला लोकांना ते आवडले नाही, कारण त्या वेळी पिण्याच्या पाण्याची कमतरता नव्हती, तसेच बाटलीबंद पाण्याची फॅशनही नव्हती. त्या वेळी ते फक्त ५-स्टार हॉटेल्स आणि उच्चभ्रू रेस्टॉरंट्समध्ये विकले जात होते. यामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले. परिणामी, डॉ. रॉसी आणि संतूक यांनी बिस्लेरी विकण्याचा निर्णय घेतला.
१९६९ मध्ये, पार्ले एक्सपोर्ट्सच्या रमेश चौहान यांनी केवळ ४ लाख रुपयांना म्हणजेच अंदाजे १.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला बिस्लेरी विकत घेतली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा पार्लेने बिस्लेरी विकत घेतली, तेव्हा ते पाणी नसून क्लब सोडा होता. नंतर, कंपनीने हळूहळू सर्वसामान्यांसाठी एक परवडणारे मिनरल वॉटर म्हणून मार्केटिंग करण्यात आली.
भारतीय बाजारपेठेत बिस्लेरीचा सध्या अंदाजे ३२% ते ३६% बाजारहिस्सा आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, बिसलेरी (३६%), किनले (२०%) आणि अक्वाफिना (१५%) मिळून भारतातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाजारपेठेवर अंदाजे ७१% नियंत्रण ठेवतात. यादरम्यान अनेक नवीन ब्रँड्स उदयास आले असले तरी, आपल्या विस्तृत वितरण जाळ्यामुळे आणि ब्रँड मूल्यामुळे बिस्लेरी बाजारपेठेत अग्रस्थानी आहे.